Breaking News

दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने

- शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या

मुंबई/विशेष प्रतिनिधी 
राज्यभरात दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष सोमवारी रस्त्यावर उतरले होते. अकोले, अहमदनगर येथे दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकर्‍यांनी निषेध केला. तर दूध संकलन वाढवावे यासाठी भाजपकडून शासनाला निवेदन देण्यात आले. राज्यभर विविध ठिकाणीही आंदोलने करण्यात आली.
दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, यासह विवीध मागण्यांसाठी शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष यांच्या माध्यमातून राज्यभर केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला गेला. जिल्हा तालुका स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन आणि दूध पिशवीची भेट दिली गेली. जर या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाहीतर १ ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेन मंगळवारी दूध बंद आंदोलन पुकारले आहे.

भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्यांचे सरकार असताना तीन वर्षे कठीण गेली. शेतकरी तेव्हा आंदोलन करत होते, त्यावेळी भाजपने दखल घेतली नव्हती. शेवटी कुठे त्यांनी थोडी मदत केली. गेले चार महिन्यापासून आम्ही पावडर करण्याचा निर्णय घेतला. त्यात चारशे ते पाचशे कोटी शासनाने खर्च केला अजूनही खर्च आवश्यक असेल तर सरकार करेल, असे थोरात म्हणाले. दूध दरासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री, शेतकरी संघटनेचे काही प्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. मंत्रालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.