Breaking News

डॉ. बोरगे, मिसाळला सस्पेंड करा!

- छावा, समाजवादी पक्षाची मनपा आयुक्तांकडे मागणी- शहराला काळिमा फासणार्‍या घटनेचा केला निषेध


अहमदनगर/प्रतिनिधी 
महापालिका नर्सच्या घरी दारुपार्टी करत तिच्या 14वर्षीय अल्पवयीन मुलाला सिगारेटचे चटके देऊन अमानुष मारहाण करणार्‍या व एकूणच प्रकाराने शहराच्या नावाला काळिमा फासणारे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ व इतर आरोपींना तातडीने सस्पेंड करा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटना व समाजवादी पक्षाने महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे केली आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल शहरवासीयांतूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे आरोपी सद्या तोफखाना पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या एकूण भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या कर्तव्याचे पालन न करता शहराला काळिमा फासणारे कृत्य केल्याचा निषेध अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने करण्यात आला. तर मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व आरोपी कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्याची मागणीही उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, आशा गायकवाड, सुमेता शेजुळ, सुरेखा साळी, विलास कराळे आदि उपस्थित होते. तसेच, गुन्हा दाखल झालेल्या मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी समाजवादी पक्षाच्यावतीने करण्यात आली. या गैरकृत्याचा निषेध नोंदवून सदर मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त (कर) संतोष लांडगे यांना देण्यात आले. यावेळी समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजिम राजे, मोहंमद हुसेन व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसह लिपिकाच्याविरोधात तक्रार देणार्‍या अल्पवयीन मुलास बुधवारी दुपारी बेदम मारहाण झाली. याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा घृणास्पद गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच फिर्यादी मुलास मंगळवार बाजार परिसरातील मैदानात चार ते पाच जणांनी मारहाण करून फिर्याद मागे घे, अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे घृणास्पद घटना..बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्यप्राशन करुन महापालिकेचा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन गच्ची वरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना 13 जून रोजी घडली होती. याबाबत पीडित मुलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, पोलिसांनी जीवे मारण्याचा गुन्हा न दाखल करून आरोपींना दिलासा दिला आहे. तसेच, आरोपी संशयास्पदरित्या फरारदेखील आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षत मुलाणी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.