Breaking News

राष्ट्रवादीत जाणे ही चूकच होती!

- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना खंत- भाजपमध्ये थांबलो असतो तर मुरकुटेंऐवजी आमदार असतो!पुरुषोत्तम सांगळे/अहमदनगर


भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे ही त्यावेळची सर्वात मोठी राजकीय चूक होती. भाजपमध्येच थांबलो असतो तर बाळासाहेब मुरकुटे यांच्याऐवजी मीच आमदार असतो, अशी खंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केली. एका खासगी कार्यक्रमात लंघे यांची भेट झाली असता, झालेल्या औपचारिक चर्चेत त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
नेवासा तालुक्यात चांगला जनाधार असलेले नेते म्हणून विठ्ठलराव लंघे यांना ओळखले जाते. परंतु, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या आग्रहाखातर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा गडाखांनी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन नेवासा तालुक्यातील आपला प्रबळ विरोधक संपविला होता. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत शंकराव गडाख व विठ्ठलराव लंघे यांची राजकीय लढत झाली असती तर लंघे हे विक्रमी मतांनी निवडून आले असते. कारण, एक तर त्यावेळी भाजपची लाट होती. दुसरे, लंघे हे मास लीडर असल्याने त्यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. परंतु, लंघेचा राष्ट्रवादी प्रवेश हा बाळासाहेब मुरकुटे यांच्या पथ्यावर पडला; आणि पाठीमागे मतदार नसतानाही केवळ भाजपच्या लाटेवर मुरकुटे कमी फरकाने आमदार झालेहोते.
नेवासा तालुक्यातील गेवराई येथे नुकतीच विठ्ठलराव लंघे यांची एका खासगी कार्यक्रमात भेट झाली असता, त्यांनी औपचारिक चर्चेत उपरोक्त खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, राष्ट्रवादीत जाणे ही सर्वात मोठी राजकीय चूक होती. परंतु, जवळचे कार्यकर्ते तिकडे गेले होते. मलाही वाटले तालुक्यातील मोठ्या कारखानदारांविरोधात आपली ताकद पुरणार नाही, म्हणून तिकडे गेलो. परंतु, भाजपमध्ये थांबलो असतो तर नेवाशाचा आमदार झालो असतो, असे सांगून त्यांनी खंतही व्यक्त केली. 2012 साली स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात विठ्ठलराव लंघे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तत्पूर्वी 2009च्या निवडणुकीत अवघ्या 21 हजार मतांनी त्यांचा विधानसभेला पराभव झाला होता. त्यांच्या पराभवानंतर अनेक गावांत निकालाच्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या. त्यावेळी विद्यमान मंत्री शंकरराव गडाख व लंघे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत लंघे यांना 69 हजार 943 तर गडाख यांना 91 हजार 429 मते पडली होती. 2014च्या निवडणुकीत लंघे हे भाजपमध्ये असते तर त्यांना बाळासाहेब मुरकुटे यांच्याऐवजी भाजपची उमेदवारी मिळाली असती. या निवडणुकीत मुरकुटे यांना 84 हजार 570 तर गडाख यांना 79 हजार 911 इतकी मते मिळाली होती. म्हणजे, फार कमी फरकाने गडाख पडले होते. वास्तविक पाहाता, आमदारकीवर डोळा ठेवूनच मुरकुटे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. त्यांच्यामागे जनाधार नसतानाही केवळ भाजपच्या लाटेत ते आमदार झाले होते. तर दुसरीकडे विठ्ठलराव लंघे हे जनाधार असलेले (मास लीडर) नेते आहेत. आता नेवाशा तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय पोकळी निर्माण झाली असून, विठ्ठलराव लंघे हे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गडाख-लंघे हा राजकीय संघर्ष पुन्हा पहायला मिळणार आहे. गडाखांकडे मंत्रिपद असूनही त्याचा फायदा नगर जिल्हा किंवा नेवासा तालुक्याला होताना दिसत नाही. दुसरीकडे, बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वार्थी राजकारणामुळे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना दूर लोटले आहे. भाजपच्या कार्यकारिणीत स्थान मिळाले असल्याने त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस समर्थक अशी छाप पडली असून, त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक एक मोठा गट त्यांच्यापासून दूर गेला. तसेच, त्यांच्यासह काही पराभूत नेत्यांनी भाजपनेते राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात तक्रारी केल्यामुळे विखेगटही मुरकुटे यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक असलेल्या विठ्ठलराव लंघे यांना भाजपातील सामान्य कार्यकर्ता व वंजारी, माळी, मराठा हा तेथील मोठा मतदार समर्थन देताना दिसून येत आहे. पुढील विधानसभा निवडणूक ही गडाख व लंघे यांच्यात होईल, त्यासाठी आतापासून लंघेसमर्थक कार्यकर्त्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.

राज्यमंत्रिमंडळात नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे शंकरराव गडाख यांना आपली छाप पाडता आली नाही. नेवासा असो की जिल्ह्याचे राजकारण त्यांना मंत्री म्हणून आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही. तर दुसरीकडे, बाळासाहेब मुरकुटे यांचे राजकारण संपल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत विठ्ठलराव लंघे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी तालुक्यात आपला जनाधार वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक ही गडाखविरुद्ध लंघे अशीच रंगणार, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे.