Breaking News

नगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीनेला आला पूर !

नगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस

- सीनेला आला पूर
- बळीराजाला दिलासा
अहमदनगर/प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. नगर तालुक्यातील काही भागांत अतिवृष्टी झाली. यात सीना नदी पात्रा लगतच्या नावांचा समावेश असल्याने सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. यंदाच्या पावसात सलग चौथ्यांदा सीना नदीला पूर आला आहे.
शुक्रवारी पहाटेनंतर सीना नदीला पूर आला होता. या पुरामुळे वारूळाचा मारूती परिसर, कल्याण रस्ता, काटवन खंडोबा पूल, लोखंडीपूल, भूतकरवाडी, सावेडी परिसर या भागात पूर स्थिती निर्माण झाली. काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. या जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांत पूर स्थिती निर्माण झाली असून, सीना नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नगर तालुक्यात ११ महसूल मंडळे आहेत. यातील सहा महसूल मंडळांत काल अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे या परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. यात सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, जेऊर व चास मंडळांचा समावेश आहे. या पावसामुळे नदी लगत असलेल्या गाळपेरीतील पिके या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. मेहेकरी नदीच्या तिरावर असलेली मेहेकरी, भातोडी, पारगाव, चिचोंडी पाटील, आठवड, या गावांनाही कालच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पावसाने मेहेकरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसाळ्यात प्रथमच राहुरी तालुक्यातील देव नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सडे येथे देव नदीच्या पूलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे सडे-वांबोरी रस्ता शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद पडला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सडे पुलाचा काही भाग तुटला होता. नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली होती.
-----------------