Breaking News

गंगामाई कारखान्याने केला ६१ एकर क्षेत्रावर सुधारित ऊस बेणे मळा !

गंगामाई कारखान्याने केला ६१ एकर क्षेत्रावर सुधारित ऊस बेणे मळा
 घोटण/प्रतिनिधी:
सन २०१० मध्ये गंगामाई कारखान्याने प्रथम चाचणी गळीत हंगाम यशस्वीरित्या घेऊन  शेवगाव, नेवासा, पैठण, गंगापूर व गेवराई तालुका व कारखाना परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा ऊस  वेळेवर  गाळप  होण्याची शास्वती गंगामाई कारखान्यामुळे मिळाली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा ऊस वेळेवर तुटून वेळेवर पेमेंट  मिळण्याची  शास्वती आल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात उस लागवड क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. परंतु कारखान्याने उसाचे लागवड क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शणात आले की, एकुण ऊस क्षेत्रापैकी ९५% ऊस फुले- २६५ जातीचा उशिरा परिपक्क होणारा असून  इतर कारखानाचे तुलनेत  साखर उतारा कमी येतो.  गंगामाई  कारखान्याचे चेअरमन मा. श्री. पद्माकररावजी मुळेसाहेब व कार्यकारी संचालक मा. श्री. रणजीतभैय्या मुळे  यांनी  कारखाना कार्यक्षेत्रांमध्ये ऊस उत्पादकांना नवीन सुधारित लवकर परिपक्व होणारे, जास्त उत्पादन व साखर उतारा देणारे ऊस वाणाचे बेणे उपलब्ध व्हावे या हेतूने कारखाना मालकीच्या शेतीमध्ये ६१ एकर क्षेत्रावर फुले-९०५७,  कोव्हिएसआय-८००५,  को-१०००१, कोव्हिएसआय-१८१२१,
 को- ८६०३२  या सुधारित जास्त उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या ऊस जातीचे बेणे मळा केलेला आहे.  
    मौजे- ब्रम्हगव्हाण ता. पैठण  येथील शेतीमध्ये ३५ एकर क्षेत्रावर सुधारित ऊस वाणाची लागवड माहे- जानेवारी, २०२० मध्ये केलेली असून ऊस बेणे शेतकऱ्यांना माहे- सप्टेंबर/ ऑक्टोबर, २०२० मध्ये पुर्व हंगामी ऊस लागवडी करीता उपलब्ध होईल. तसेच मौजे- घोटण येथील कारखाना मालकीचे शेतीमध्ये २६ एकर क्षेत्रावर आज रोजी उसाची लागवड सुरू केलेली आहे.  ऊस लागवड करण्यापूर्वी सदर क्षेत्रावर आडवी-उभी नांगरट करून एकरी ३ ट्रॉली शेणखत टाकले आहे. ऊस लागवडीपूर्वी एकरी १ गोणी युरिया, २ गोण्या सुपर फॉस्पेट, १  गोणी म्युरिट ऑफ पोटॅश, व २ गोण्या पँल्टो दाणेदार बेसल डोस दिला आहे. ऊस लागवड करण्याअगोदर ऊस बेणे प्रक्रिया करण्याकरिता एकरी-३०० ग्रॅम बाविस्टीन व १०० मिली कीटकनाशक वापरले आहे. बेणे दोन डोळ्यांची टिपरी करून पाच फुटांच्या सरीवर लागवड केलेली केला असून संपूर्ण लागवड ठिबक सिंचनवर केली आहे.  सदर बेणे प्लॉट मधील बेणे ८ ते ९ महिन्यानंतर माहे- जानेवारी/ फेब्रुवारी, २०२१  मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होईल असे मुख्य ऊस विकास अधिकारी श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले.  आधुनिक ऊस लागवड प्रात्यक्षिक पहाण्याकरीता परिसरातील ऊस उत्पादक मोठ्या संखेने उपस्थित होते.  कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. रमेश कचरे यांनी शेतकऱ्यांना फुले-२६५ ऐवजी लवकर परिपक्व होणारे व जादा उत्पादन देणारे फुले-९०५७,  कोव्हिएसआय-८००५,  को-१०००१, कोव्हिएसआय-१८१२१,
 को- ८६०३२ या सुधारित वाणाचे ऊसाची लागवड आडसाली व पुर्व हंगामी लागवड हंगामात करावी जेणे करून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेल व कारखान्यास गाळप हंगामाचे सुरुवातीस परिपक्व ऊस उपलब्ध होईल. 
गंगामाई कारखान्याने सामाजिक बांधिलकी व आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने यापुर्वी पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र घेवून शेवगांव, पाथर्डी, नेवासा, गंगापूर तालुक्यातील शासनाने बांधलेल्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण स्वनिधी मधून केलेले आहे. परिसरातील कच्चे रस्ते, शिव रस्ते दुरुस्ती, वृक्षरोपण,केले आहे. त्याचबरोबर कोविड - १९ या संसर्गजन्य आजारा पासुन बचावाकरीता कारखानाने उत्पादीत केलेले हॅण्ड सॅनिटायझर शासकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, कोविड योध्दे व शेवगांव, पाथर्डी, नेवासा, गंगापूर, गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, देवस्थान यांना हॅण्ड सॅनिटायझर व गरजु मनुरांना किराणा व धान्य  मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.  शेवगांव तालुक्यात गंगामाई कारखाना सुरु झाल्यापासून तालुक्यातील हजारो कुशल-अकुशल तरुनांना व ऊस तोड वाहतुक कामगराना तालुक्यातच रोजगार उपलब्ध झाला आहे.गंगामाई कारखान्यामुळे परिसरात रोजगार उपलब्ध झाल्यामुळे व उस उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यामधे आर्थिक सुबत्ता येण्यास मदत झालेली आहे.