Breaking News

'अब बेबी पेंग्विन तो गयो'; नितेश राणेंची सूचक प्रतिक्रिया

 

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणीचा तपास नेमका कोणी करावा याबाबत सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलेला निर्णय अखेर बुधवारी सुनावला. बहुप्रतिक्षित असा हा निर्णय सुनावत सर्वोच्च न्यायालयानं सदर प्रकरणीचा तपास हा सीबीआयकडे सोपवला. ज्यामुळं महाराष्ट्र राज्य सरकारला दणका मिळाल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून मांडण्यात आली.

#SushantSinghRajput प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाहता महाराष्ट्र राज्य शासन आणि मुंबई पोलिसांनी या तपासात पूर्ण सहकार्य करणं अपेक्षित आहे. याच धर्तीवर नितेश राणे यांनी सोशल मीडियायवर एक सूचक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं. 'अब बेबी पेंग्विन तो गयो... इट्स शो टाईम', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं.

'झी२४ तास'शी संवाद साधतेवेळी राणे यांनी थेट शब्दांत यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयानं देशाची, सुशांतच्या कुटुंबीय आणि चाहत्यांची भावना लक्षात घेत त्या भावनेचा आदर करत निर्णय दिला आहे. मला विश्वास आहे जी लवपालवपी होत होती, सुशांतच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते त्याला चाप बसेल. तेव्हाच सुशांतला न्यायही मिळेल', असं राणे म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या नावही वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर राणेंनी हे ट्विट केल्याचं स्पष्ट होत आहे. याच धर्तीवर राजकारण आम्ही करतो, की ठाकरे सरकार हे महाराष्ट्र आणि देशानं पाहिलं आहे असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली.