Breaking News

दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर, मुंबई पोलिस कुणाला वाचवत आहेत?

दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर!
मुंबई पोलिस कुणाला वाचवत आहेत?

- भाजप नेते नारायण राणे यांचा खळबळजनक आरोप
- राणेंच्या आरोपाची सुई एका मंत्र्यांवर!
मुंबई/ विशेष प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह  राजपूत आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील तसेच देशातील राजकारण ढवळून निघत आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. याच प्रकरणावरून भाजपचे नेते व राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकारवर वर हल्लाबोल केला. सुशांतचा खून झाला असून, त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप राणे यांनी केला आहे.
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिस कोणाला वाचवत आहे, असा प्रश्‍नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिचीदेखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आले. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा, असे नारायण राणे म्हणाले. सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचे आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही, असे नारायण राणे म्हणाले. बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण येथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेले नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होते? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिले. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत, असेही राणेंनी यावेळी सांगितले.