Breaking News

महाविकास आघाडीच्या विरोधात.. काँग्रेसचे ११ नाराज आमदार बसणार उपोषणाला !

 भाजप सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ...

जालना : भाजपाला धक्त देत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि सत्तेच्या गणिताचा मेळ बसवत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर मात्र, या आघाडीतील पक्षांमध्ये पहिल्या सहामाहीमध्येच अंतर्गत नाराजीचे सूर बाहेर येऊ लागले होते. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने तर या सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी न सोडता ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’, असा अंदाज लावला होता.

तर, हे सरकार सामान्य जनतेच्या हिताचे, त्यांच्या मनाप्रमाणे असून अत्यंत कष्टाने स्थापन झालेले आहे, त्यामुळे ५ वर्षेचं काय कायम टिकेल असे महाविकास आघाडीतील नेत्यांनी सांगितले. दरम्यान, पारनेर घटनेनंतर शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये आलेली तात्काळ नाराजी असो व सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार असो, या कुरबुरी चालुच असल्याचे दिसून आले होते.

आता, काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समजत आहे. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

याआधी देखील, महाजॉब्स पोर्टल वरील छायाचित्र प्रकरण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातील बदल्या यावरून काँग्रेसची उघड नाराजी समोर आली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘ हे सरकार एकमेकांना लाथा घालून पडेल’ असे केलेले विधान खरे ठरणार का? याबाबत आता कुजबुज सुरु झाली आहे.