Breaking News

नगरच्या उद्योगजगतातील ‘कोहिनूर’ हरपला!

- कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीप गांधी यांचे निधन

अहमदनगर/ प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अहमदनगरमधील कोहिनूर या वस्त्रदालनाचे संचालक  प्रदीप वसंतलाल गांधी (वय 65) यांचे मंगळवारी  दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला.
अहमदनगरमध्ये कापड बाजारातील कोहिनूरचे वस्त्रदालन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्व. वसंतलाल गांधी यांनी उभारलेल्या या दालनाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रदीप गांधी यांनी परिश्रम घेतले. या वस्त्रदालनातील वस्त्रांना महाराष्ट्रातील ग्राहकांची पसंती असायची. नगर शहरातील सांस्कृतिक, नाट्य आणि शहर विकासाच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात व जिल्ह्यात वार्‍यासारखी पसरली. एक व्यापारीच नव्हे तर शहराच्या जडणघडणीत योगदाने देणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, दोन नातू असा परिवार आहे. सध्या कोहिनूरची धुरा संभाळणारे उद्योजक अश्‍विन गांधी यांचे ते वडील होते. दीड महिन्यापूर्वी कोहिनूर वस्त्रदालनातील काही कर्मचारी करोनाने बाधित आढळले होते. चार दिवसांपूर्वी उद्योजक प्रदीपशेठ गांधी यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 
----------