Breaking News

पारनेर तालुक्यात ४५७ लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान जमा- सभापती गणेश शेळके

पारनेर तालुक्यात ४५७ लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान जमा- सभापती गणेश शेळके 
पारनेर प्रतिनिधी -
पारनेर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ४५७ लाभार्थ्यांना ५४ लाख ८४ हजारांचे शौचालयाचे अनुदान जमा केल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी दिली.
     यासंदर्भात बोलताना श्री. शेळके म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची प्रकरणे केलेल्या ४५७ लाभार्थ्यांच्या कागदपत्रांचा पाठपुरावा व पूर्तता केल्याने ५४ लाख ८४ हजारांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १ हजार १८० लाभार्थ्यांना १ कोटी ४१ लाखांचे अनुदानाचे वाटप करण्यात आल्याचे श्री शेळके यांनी सांगितले. पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे लाभार्थ्यांनी यासंदर्भात पंचायत समितीशी संपर्क साधून विविध योजना बाबत माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा काही अडचण आली तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती गणेश शेळके यांनी केले आहे
   पंचायत समितीच्या वतीने गोठा कॉंक्रिटीकरण, शेळी निवारा शेड तसेच विविध अनुदान पात्र वैयक्तिक योजनेचे प्रस्ताव सुरू असून याचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहनही श्री .शेळके यांनी केले आहे.
     तसेच सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे डिस्टन्स व मास्क चा वापर करावा आपली व आपल्या कुटुंबाची या काळामध्ये काळजी घ्यावी असे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले