Breaking News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना कोरोना - एम्स रुग्णालयात दाखल !

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना कोरोना - एम्स रुग्णालयात दाखल !
- अयोध्येतील भूमिपूजनाला गैरहजर राहणार
नवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटले की, कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने मी कोविड-१९ टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.
येत्या ५ ऑगस्टरोजी राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र रविवारी त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते आता राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह सक्रीय झाले होते. दिल्लीत वाढलेल्या चाचण्यांचे श्रेय महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे दिसते. ट्विटरवर अनेक जणांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत.