Breaking News

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन !

Former Maharashtra Chief Minister Shivaji Rao Patil Nilangekar ...

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले. पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉस्पिटलमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १६ जुलै रोजी ते पुढील उचारासाठी लातूरहून पुणे येथील रुबी हॉल मध्ये दाखल झाले होते.

 तीन दिवसापूर्वी त्यांनी कोरोनावर वयाच्या ८९ व्या वर्षी मात केली होती. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते मूळ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. निलंगा गावाहूनच त्यांनी आपली राज्यच नव्हे देशभर निलंगेकर म्हणून ओळख निर्माण केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ पर्यंत म्हणजेच ०९ महिन्याच्या अल्प काळासाठी महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 

२००२ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री होते. याशिवाय राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. तसेच ते काही काळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना १९९५ आणि २००४ मध्ये निलंगा विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

१९९५ मध्ये माणिकराव जाधव यांच्याकडून तर २००४ च्या विधानसभेत नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. पुढे २००९ विधानसभेत त्यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचाही पराभव केला होता. नातू संभाजी हे माजी मंत्री तथा भाजप नेते आहेत. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं-सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.