Breaking News

शेतकऱ्यांना युरियाचा मुबलक पुरवठा करा - माळवदे

शेतकऱ्यांना युरियाचा मुबलक पुरवठा करा - माळवदे
नेवासा/प्रतिनिधी :-
      तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याने मुबलक साठा उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली आहे.
     नेवासा तालुका काँग्रेसची मासिक बैठक नेवासा फाट्यावरील वाघमारे शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे होते. जिल्हा कार्यकारीणी सदस्य जगन्नाथ कोरडे, सुदाम कदम, तसेच युवक काँग्रेसचे निरीक्षक देवेंद्र कडू, यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. 
      यावेळी बोलताना माळवदे यांनी पक्ष संघटन,कोरोनाच्या परिस्थिती मध्ये व्यापारी व जनतेस निर्माण झालेल्या अडचणी सोडविणे, शासकीय दरबारी जनतेची होणारी अडवणूक, समस्या दूर करणे, आघाडी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविणे व त्यांचा प्रचार प्रसार करणे  रस्ते, तहसील, पोलीस आदी ज्वलंत प्रश्नांसह शासकीय कमिट्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसाठी युरीया मिळत नसल्याची बाब गांभिर्याने घेऊन तो मुबलक प्रमाणात व माफक दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी करताच सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करुन याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना देणार असल्याचे नमूद केले. 
     ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सचिव जाकीर शेख यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे तसेच तनवीर शेख, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, प्रसिद्धीप्रमुख सचिन बोर्डे, सतिष तऱ्हाळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे यांनी केले तर नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी शेवटी आभार मानले.