Breaking News

धक्कादायक ! स्पॅनिश फुटबॉल क्लबचे ३५ % खेळाडू करोनाने बाधित !

 जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. युरोपातील बहुतांश मानाच्या फुटबॉल स्पर्धा करोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अनेक फुटबॉलपटूंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हेलेंसियामधील ३५ टक्के खेळाडू आणि कर्मचारी हो करोनाने बाधित असल्याचं समोर आलंय. फुटबॉल क्लबच्या प्रशासनाने याबद्दल माहिती दिली.

स्पेनमध्ये आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. यातील २९७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. "क्लबचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि खेळाडू यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यातील ३५ टक्के खेळाडू हे करोनाने बाधित असल्याचं समोर आलंय. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आम्ही उर्वरित कर्मचारी आणि खेळाडूंना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत." फुटबॉल क्लबने परिपत्रक काढून प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

दरम्यान स्पेनमधील आल्टा क्लबच्या २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाला करोना विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतामध्येही दर दिवशी करोनाचे रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कडक केले आहेत. केंद्र व राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.