- गृहमंत्री अनिल देशमुख केले ट्विट मुंबई/ प्रतिनिधी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांनीही लॉकडाउनचा निर्णय...
- गृहमंत्री अनिल देशमुख केले ट्विट
मुंबई/ प्रतिनिधी
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांनीही लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी केंद्र सरकारने राज्यांना राज्यातंर्गत आणि राज्या-राज्यातील वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.
प्रवासी तसेच आंतरराज्य मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने असू नयेत, असे केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारेंना कळवले आहे. केंद्रीय राज्य सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवले आहे. अनलॉक-3 च्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष वेधून भल्ला म्हणाले की, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत अडचणी निर्माण होतात आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे आर्थिक घडामोडी किंवा नोकरीमध्ये अडथळा निर्माण होतो. ते पत्रात म्हणाले की अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आंतरराज्य व राज्यांमध्ये व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतेही बंधन असू नये. केंद्राने राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. वस्तू व प्रवासी राज्यातंर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केल्यासंदर्भात केंद्राने अलिकडचे जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हातंर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.