Breaking News

आ. निलेश लंके यांच्या पत्राची मुख्यमंत्री ठाकरेंकडून दखल तलाठी कोतवालांनाही विम्याचे कवच !

आ. निलेश लंके यांच्या पत्राची मुख्यमंत्री ठाकरेंकडून दखल तलाठी कोतवालांनाही विम्याचे कवच !
---------------
कोरोना काळात जीवाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी कोतवालानाही विम्याचे कवच
-----------
आमदार निलेश लंके यांनी केला या संदर्भात पाठपुरावा


पारनेर प्रतिनिधी -
     तलाठी व कोतवाल संवर्गातील कर्मचा-यांना कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर विमा सुरक्षा कवच देण्यासंदर्भात महसूल विभागाने विविध विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून माहीती मागविली आहे. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून या कर्मचा-यांना विम्याचे कवच देण्याची मागणी केली होती.
     कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांचा शासनाने 90 दिवसांसाठी 25 रूपयांचा विमा उतरवून त्यांना सुरक्षा कवच प्रदान केले आहे. हा निर्णय घेतल्याबददल आ. लंके यांनी ठाकरे यांच्याप्रती पत्रामध्ये कृतज्ञता व्यक्त केली. या कर्मचा-यांप्रमाणेच राष्ट्रीय आपत्तीमध्ये काम करणारे, प्रशासन आणि गावाचा दुवा व कणा असलेले महसूल कर्मचारी समन्वयाचे महत्वाचे काम करीत आहेत. 
     कोरोनासह आरोग्य जनगागृतीचे काम करणे व शांतता ठेवण्याचे काम महसूल कर्मचारी जिवाची पर्वा न करता करतात. त्यामुळे त्यांना विमा सुरक्षा कवच देणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना विषाणूच्या लढाईत सहभागी असणा-या महसूल कर्मचा-यांचा विमा उतरविण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची विनंती आ. लंके यांनी पत्राद्वारे केली होती.
     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आ. लंके यांच्या पत्राची दखल घेत महसूल विभागास पुढील कार्यवाहीच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कक्ष अधिकारी र. धो. कटके तसेच दिनेश ढोक यांनी राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून तलाठी व कोतवाल संवर्गाची माहीती मागविली आहे. लवकरच त्यासंदर्भात निर्णय होणार आहे.