Breaking News

दुग्ध व्यवसाय वाचविण्यासाठी १० रुपये अनुदानाची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी !

दुग्ध व्यवसाय वाचविण्यासाठी १० रुपये अनुदानाची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी !
--------------
 तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे निवेदन सुपूर्द 
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी :
            शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय सद्या मोठ्या संकटातून वाटचाल करीत असून हा व्यवसाय आणि त्यावर आधारीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रती लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील दूध उत्पादकांनी मा. मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले.
        निवेदनात पुढे नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई (महानंदा ) यांच्यामार्फत सहकारी संघांकडून दूध रुपांतरासाठी घेण्यात येत होते. मात्र एकूण संकलनाच्या अतिशय नाममात्र प्रमाणात खरेदी केले जात आहे. तेही दि.२७ जुलै २०२० पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्य:स्थितीत शासनाने दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दूध दराप्रमाणे सर्व दुधावर दर द्यावा लागत आहे. त्यामुळे संघांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती कोरोना महामारीच्या संकटामुळे अतिशय अडचणीची व
बिकट झालेली आहे. त्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाइतपत देखील खर्च भागविता येत नाही. कारण दुग्धव्यवसायाच्या अनुषंगिक बाबींचे ( पशुखाद्य, चारा, पाणी, मिनरल मिक्चर ) या वस्तुंचे दर गगनाला भिडलेले आहे, त्यामुळे उपलब्ध असलेले पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे. अशा परिस्थितीत शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य न केल्यास इतक्या दिवस जपून ठेवलेले पशुधन विकावे लागेल की काय ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जर एकदा पशुधन विकले
गेल्यास चार पाच वर्षे पुन्हा दुधाळ पशुधन निर्माण करण्यास कालावधी जाणार आहे. ही गंभिर परिस्थिती विचारात घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्व उत्पादीत दुधावर अनुदान      मिळणे गरजेचे आहे.
          गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघ हा ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या
आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी गेली ४५ वर्षापासून कार्यरत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दुग्धव्यवसायावर दिवसेंदिवस विपरित परिणाम होत आहे. बाजारपेठेतील पॅकींग दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तसेच बाजारपेठेतील पावडरचे दर देखील
कमी होत आहेत. मुळात दुग्धव्यवसाय हा अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, अल्पबचत गट यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. दुग्धव्यवसाय मोडकळीस आल्यास उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होवून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिणाम होवू शकतो, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादित सर्व दूधावर प्रतिलिटर १० रुपये प्रमाणे अनुदान मिळावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदनावर दूध उत्पादक शेतकरी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, राजेंद्रबापू जाधव, ज्ञानदेव गुडघे, जयराम पाचोरे, भागवतराव
धनवटे, उत्तमराव माने, भाऊसाहेब कदम, यशवंतराव गव्हाणे, गोपीनाथ केदार, सुनील खालकर, राजेंद्र निकोले, ज्ञानदेव शेळके, सुदामराव शिंदे, गोरखनाथ शिंदे, आंबादास वराडे, लक्ष्मणराव शिंदे, नानासाहेब गवळी, शफिलाल सय्यद, प्रभाकर घाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांनाही देण्यात आलेल्या आहेत