Breaking News

संवत्सर येथील ऋषीपंचमी सोहळा कोरोना संसर्गामुळे रद्द !

संवत्सर येथील ऋषीपंचमी सोहळा कोरोना संसर्गामुळे रद्द !

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
 संवत्सर येथील रविवार दि. २३ ऑगष्ट रोजीचा ऋषीपंचमीचा सोहळा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिली. या सोहळ्यानिमित्त दरवर्षी होणाऱ्या ह. भ. प. मिराबाई मिरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमालाही महिला व भाविकांना मुकावे लागणार असल्याने परिसरात नाराजीचा सूर असला तरी सोहळा स्थगित ठेवण्याचा ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याच्याही प्रतिक्रिया जाणकार मंडळीकडून व्यक्त केल्या जात आहेत.
             संवत्सर हे गांव रामायण काळातील दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋषींचे  वास्तव्य होते. त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे. या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते. म्हणून या ठिकाणाला
अनन्य साधारण महत्व आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सर येथे प. पू.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेणे स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांनी दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यादृष्टीने परंपरा चालू ठेवलेली होती. ती आजतागायत सुरु आहे. शृंगऋषींच्या मंदिराजवळील गोदावरीच्या काठावर महिला मोठ्या संख्येने स्नानाची पर्वणी साधतात.ह. भ.प. मिराबाई मिरीकर यांनी दरवर्षी संवत्सरला येवून किर्तन सेवा पार पाडण्याचे वचन दिलेले आहे. त्यानुसार श्री शनी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम होत असतो. यावेळी
मात्र या सर्वच धार्मिक कार्यक्रमांस भावीकांना मुकावे लागणार आहे.
            यावर्षी गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या महिलांनी व भाविकांनी जास्त गर्दी न करता व थेट नदी पात्रात खोलवर न उतरता काठावरुनच स्नानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही राजेश परजणे पाटील, कृष्णराव परजणे पाटील, विवेक परजणे पाटील व ग्रामस्थांनी केले.