Breaking News

दूध दर आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात धार!

दूध दर आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात धार!

आंदोलकांनी दुधाचे टँकर फोडले

- दुधाला अनुदान मिळण्यासाठी भाजपसह मित्रपक्ष आक्रमक
- राजू शेट्टी यांनी उडविली आंदोलनाची खिल्ली
पुणे/ विशेष प्रतिनिधी
दूध दरवाढीच्या मागणीसाठी विरोधी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शनिवारी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखत ते फोडण्यात आले. त्यामुळे हजारो लीटर दुधाची नासाडी झाली. काही ठिकाणी रास्ता रोको केला गेला तर काही ठिकाणी सरकारचा निषेध म्हणून दगडाला अभिषेक घालण्यात आला.
दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. मराठवाडा व विदर्भात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. भाजप, किसान संघर्ष समिती व रयत क्रांती संघटनेसह मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. रयत क्रांती संघटनेने शुक्रवारी रात्रीच आष्टा-भिलवडी मार्गावर दुधाचा टँकर फोडून आक्रमक होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार दिवसभर अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुधाचे टँकर अडवत ते फोडत होते. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांतील दूध संकलनावर परिणाम झाला होता. पंढरपूर येथे रासपचे आमदार महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीत विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घातला तर मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर रयत क्रांती संघटनेचे टायर पेटवून आंदोलन केले. सांगली जिल्ह्यात कराड ते तासगाव मार्गावरही रयतच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन झाले. तिथे गावच्या चावडीवरील दगडाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरात दुधाची गाडी अडवून लोकांना दूध वाटले. या आंदोलनात रस्त्यावर दूध फेकले जाणार नाही, टँकर अडवले जाणार नाहीत, दुधाचा अभिषेक घातला जाणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या मित्रपक्षांनी याला हरताळ फासत टँकर तर फोडलेच, शिवाय अनेक ठिकाणी दुग्धाभिषेकदेखील घातला. यामुळे या आंदोलनाची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
----
सदाभाऊ खोत यांचे आंदोलन फसले - राजू शेट्टी
सदाभाऊ खोत यांचे आंदोलन फसले, आंदोलनाचा फज्जा उडाला, शेतकर्‍यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत. हे आंदोलन केंद्र सरकारविरोधात आहे की राज्य सरकारविरोधात की राजू शेट्टीविरोधात आहे ते आधी ठरवा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिष्ठासारखे बोलले असावेत. माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या, ती विकून तुम्ही केलेल्या कडकनाथ घोटाळ्यातील लोकांचे पैसे परत करतो, असा टोलाही राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
--
काय आहेत मागण्या -
- गायीच्या दुधाला प्रतिलीटर १० रुपये अनुदान द्यावे
- दूध भुकटीला प्रतिलीटर ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे
- गायीच्या दुधाला ३० रुपये भाव मिळावा
-----------------------------------------------