Breaking News

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस

- अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
- खरिपाच्या पिकांना दिलासा
- विदर्भ, मराठवाड्यावर वरुणराजा मेहेरबान

पुणे/ प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील समाधानकारक पावसाचा शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत राज्यातील तब्बल १८९ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. तर राज्यातील ९३ तालुक्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच, मुंबई महानगरासह उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक भागात जोरदार पाऊस सुरु होता. मोठ्या शहरांत सखल भागातील रस्त्यांत पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुंबईत मशीद बंदर रेल्वेस्थानकाजवळ सीएसएमटी-कर्जत आणि कर्जत-सीएसएमटी अशा दोन गाड्या रुळांवरील पाण्यात अडकल्या होत्या.
अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या विभागात आतापर्यंत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यात पावसाने चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने राज्यातील अनेक धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यासोबत पावसामुळे काही नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक टीमला सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रुमला भेट देऊन अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, मुंबईमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. तसेच, १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी पुराचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.

विभागनिहाय पावसाची आकडेवारी
विभाग              पावसाची टक्केवारी

- कोकण            ९० टक्के
- नाशिक            १०९ टक्के
- पुणे               ७५ टक्के
- औरंगाबाद         १२१ टक्के
- अमरावती          १०४ टक्के
- नागपूर             ८० टक्के