Breaking News

आनंदवनात काय सुरु आहे ?

आनंदवनात काय सुरु आहे?- फोकस/ पुरुषोत्तम सांगळे
        प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन या संस्थेला आता गृहकलह आणि अंतर्गत वादाने उतरती कळा लागल्याचे दुर्देवाने म्हणावे लागेल. बाबा हे महाराष्ट्राचे भूषण. सेवेचे बाळकडू पाजणार्‍या या महामानवाची तिसरी पिढी कपाळकरंटी निघावी यापेक्षा दुसरे दुर्देव असू शकत नाही. एका सेवाभावी संस्थेची नफा कमविणारी कंपनी करण्यात येत असल्याने सेवेचा हा वटवृक्ष आता शेवटची घटका मोजू लागला आहे. रुग्णसेवा, पुनर्वसन, शेती संवर्धन आणि पर्यावरणाच्या बचावासाठी काम करणार्‍या बाबांच्या या महारोगी सेवा समितीच्या कार्पोरेटायझेशनवरुन सद्या वाद सुरु आहे. आनंदवनातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे वाद शमण्याएवजी आणखी ताणला गेला. त्यामुळेच आनंदवन या संस्थेत सध्या जे चालले आहे, त्याची राज्य शासनाने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पुण्यातील नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रकार शेखर नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन प्रकल्पामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली. १५ ऑगस्टपर्यंत लक्ष न दिल्यास स्वतःसह काही कार्यकर्ते आपापल्या घरी उपोषणाला बसतील, असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे. कोरोना परिस्थिती असतानाही २७ जून २०२० रोजी आनंदवन ग्रामपंचायत आणि आनंदवन व्यवस्थापन यांनी राजू आणि सारिका सौसागडे या कुटुंबास घरातून बाहेर काढण्याचा ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला. हा ठराव नाईक यांनी आपल्या पत्रासोबत जोडला असून, असा ठराव करणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ज्यांच्याबद्दल आम्हालाच नाही तर सर्वांना आदर आहे, अशा स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मालिका राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि एकच खळबळ उडाली. ते खरे काय खोटे काय, योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा, पण आनंदवन हे महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या समाजकार्याची अस्मिताच आहे, असे म्हटले तरी चालेल. म्हणूनच आनंदवनच्या बातम्यांच्या निमित्ताने मराठी मन हळहळले आणि दडपणाखालीही आले. स्थावर मालमत्ता आणि भक्कम बॅलन्स असलेल्या संस्था अंतर्गत वादाने दुबळ्या आणि निष्क्रिय होऊन जातात. काही प्रसंगी काळ्या पैश्याला पांढरा करायलाही कामी येतात. कंपनी ही खासगी नफा कमावायला असते. तरीही लोकसहभाग असेल, तर त्यासंबंधीचे कायदे कडक आहेत. पण इथे शासनाच्या सवलती आणि लोकांच्या देणग्या यावर चालणार्‍या ट्रस्टना बाकी तसे कायदे नाहीत. त्यामुळे बाबांच्या कुटुंबातील तिसर्‍या पिढीत असा गृहकलह निर्माण होणे सहाजिक आहे. परंतु, या पिढीने ज्या मनमानीपणे ही संस्था चालविण्याचा खटाटोप चालवला आहे, ती बाब पाहाता, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही संस्था सरकारच्या ताब्यात घेणे व ती पुनश्च एकदा समाजसेवी उपक्रमांनी चालविणे गरजेचे आहे. आता मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा पोहोचलाच आहे तर नाईक यांनी लिहिलेल्या पत्राचादेखील विचार करू. नाईक यांनी महारोगी सेवा समिती आणि समितीच्या सर्व विश्वस्तांना पत्र लिहिले होते. एखाद्या कुटुंबावर अन्याय करणे, उन्हाळ्यात त्यांची वीज तोडणे, संस्थेच्या आवारात संचारबंदी करणे, कुटुंबाला वाळीत टाकणे, आणि हे अधिकार संस्थेला कोणी दिले असे प्रश्न विचारले आहेत. संस्थेतील काही अधिकारी, हे प्रकार करीत असून, या सगळ्याला सर्व विश्वस्तांची मान्यता आहे का, विश्वस्त गप्प का आहेत, असे प्रश्न विचारले असून, त्यांनी हे हे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. १ एप्रिल २०२० रोजी महारोगी सेवा समितीने राजू आणि सारिका सौसागडे या आनंदवन येथे राहणार्‍या कुटुंबाला एक पत्र दिले होते. यामध्ये सौसागडे हे संस्थेमध्ये फुट पाडत असून, सदस्यांना खोटेनाटे सांगत आहेत. तसेच विश्वस्तांवर खोटे आरोप करीत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्याविषयी कुष्ठ रुग्णांकडून तक्रारी आल्याने, त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलींना संचारबंदी करीत असल्याचे पत्र दिले होते. हे पत्रही नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबरोबर जोडले आहे. यवतमाळ येथे आनंदवनचाच मूळगव्हाण या गावामध्ये एक प्रकल्प आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये यासाठी हा प्रकल्प बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून उभा राहिला होता. या ठिकाणी महेश देसाई आणि त्यांची मुलगी रचना देसाई काम करण्यासाठी गेले होते. त्यांना त्याठिकाणी आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी एका ईमेल मध्ये लिहिले आहेत. हे अनुभव आल्याने त्यांनी संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. हे अनुभव मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राबरोबर जोडण्यात आले आहेत. राजू शालीक सौसागडे, यांनीही आपल्या संदर्भात समितीने केलेला व्यवहार एका पत्रात मांडला आहे. आपण कुष्ठरुग्णाचा मुलगा असून, आपल्याला घराबाहेर काढण्यात आले. ही संविधानविरोधी कृती असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले असून, हे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राबरोबर जोडण्यात आले आहे. गौरव गोपीचंद शामकुले आणि विजय शंकर जुमडे या कार्यकर्त्यांनीही पत्र लिहून सौसागडे यांना घराबाहेर काढण्याची तक्रार केली. या प्रकारांमध्ये लक्ष घालावे. संबंधित अधिवâार्‍यांचे राजीनामे घ्यावेत आणि संस्था पूर्ववत आनंददायी करावी, असा आग्रह पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, धर्मादाय आयुक्त यांनी लक्ष न घातल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आनंदवनातील गृहकलहाची वाच्यता एका अग्रगण्य मराठी वृत्तपत्राने करून हा कलह जगजाहीर केल्यानंतर उरूस, जय शंकर, म्हैस या चित्रपटाचे आणि तुझी आम्री या नाटकाचे प्रसिद्ध दिग्दर्शक असलेले नाईक यांच्यासारखे व्यक्तिमत्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांचे याप्रश्नी लक्ष वेधत आहेत, म्हणजे प्रकरण तसे गंभीर आहे. खरे तर आनंदवन ही सामूहिक व समाजाची मालमत्ता आहे. बाबा आमटे यांनी लोकसहभाग व शासन अनुदानातून ही संस्था उभी केली. त्यामुळे बाबांची पुढची पिढी जर या संस्थेला आपली खासगी मालमत्ता समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पिढीचा हा गैरसमज दूर करायला हवा. त्यासाठी ही संस्था तातडीने ताब्यात घ्यायला हवी. संस्थेतील सर्व उपक्रम हे सरकारने चालवायला हवेत. तसेही ते समाज व सरकारच्या आर्थिक सहाय्यानेच सुरु आहेत. एका चांगल्या संस्थेतील असा गृहकलह आणि बाबांच्या पिढीतील हा नतद्रष्टेपणा चिंताजनकच असून, ही संस्था आपल्या ध्येयापासून भरकटल्याची ही पावतीच म्हणावी लागेल.
(लेखक हे दैनिक लोकमंथन ग्रूपचे कार्यकारी संपादक आहेत. संपर्क ८०८७८६१९८२)