Breaking News

राहुरी तहसिल मधुन शिधापञिकाची चोरी !

राहुरी तहसिल मधुन शिधापञिकाची चोरी


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : 
        चोरांकडून काय चोरले जाईल, याची शाश्वती नाही. कालच पारनेर तालुक्यातील एक दुकान चोरट्यांनी फोडले आणि चक्क केवळ सुका मेवाच चोरून नेला. दहा रूपयांच्या नोटांच्या बंडलाला त्यांनी हातही लावला नाही. राहुरीत तर अजबच प्रकारची चोरी झाली. विशेष म्हणजे पोलिसांच्या निगराणीखाली असलेल्या महसूल विभागातून नविन कोऱ्या 70 शिधापञिकांची चोरी झाली.
        पोलिस ठाण्याच्या आवारातील महसूल खात्याच्या पुरवठा विभागातून केशरी नवीन कोऱ्या 70 शिधापत्रिकांची चोरी झाली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 
        महसूल खात्याच्या पुरवठा विभागातील कर्मचारी भारती सुनील पडदुणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादीनुसार, पुरवठा शाखेतील कपाटाची कुलपे तोडून 13 ते 17 ऑगस्टदरम्यान चोराने 1400 रुपये किंमतीच्या 70 नव्या कोऱ्या केशरी शिधापत्रिका लंपास केल्या.
चोरीपूर्वी चोराने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर बाहेरुन तोडली. त्यामुळे चोरीचे चित्रीकरण होऊ शकले नाही. राहुरी पोलिस ठाणे व तहसील कार्यालय एकाच आवारात आहेत. महसूल खात्याने पकडलेली वाळूची वाहने, रस्ता अपघातातील वाहने, चोरांच्या ताब्यातून हस्तगत केलेली वाहने, याच आवारात ठेवलेली असतात.
          जप्त केलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या, टायर, स्पेअर पार्ट चोरीच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत. अगदी जप्त केलेल्या वाहनांच्या चोरीचा प्रकार समोर आला आहे. मात्र, तहसील कार्यालयातील वस्तूंची चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे.