Breaking News

अग्रलेख : तसे झाले तर रक्त दोन्हीबाजूने सांडेल !

अग्रलेख : तसे झाले तर रक्त दोन्हीबाजूने सांडेल !
    अयोध्येत एकीकडे राममंदिराचे विधिवत भूमिपूजन पार पडत असताना, दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी एक ट्वीट करत राममंदिराचे हाया सोफिया करू, असा इशारा दिला होता. बहुतांश भारतीयांना हे हाया सोफिया काय प्रकरण आहे, हेच माहिती नसल्याने त्यांना या ट्वीटचे गांभीर्य कळलेच नाही. दुसरीकडे, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या आणि त्या अनुषंगाने एकूणच मुस्लीम समाजाच्या मनात काय भावना आहेत, हे यानिमित्ताने दिसून आले. राम मंदीर हे वेगळे आणि हाया सोफिया हे वेगळे प्रकरण आहे. परंतु, त्यांची एकमेकांशी सांगड घालण्याचा उद्दामपणा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केला. आणि, भविष्यातील एका रक्तरंजित क्रांतीचे सूतोवाच केले. वास्तविक पाहाता, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दोन्ही धर्मीयांनी स्वीकारला आहे. तथापि, हा निकाल मान्य नसलेला एक मोठा वर्ग मुस्लीम समुदयात आहे. हाच वर्ग आता राम मंदिराचे हाया सोफिया करू अशी तुघलकी भाषा वापरत आहे. तसे या देशात कदापिही होणार नाही. आणि, यदाकदाचित तसे झालेच तर मात्र या देशाचा इतिहास आणि भूगोल दोन्हीही बदललेले असेल. या देशाच्या इतिहासाचे एक पान रक्ताने माखले जाईल. एका रक्तरंजित इतिहासाला हा भारत पुन्हा एकदा सामोरे जाईल. जगात फार कमी अशा भव्य ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या मोठ्या धर्मांचा तसेच दोन राजवटींचा सांकृतिक, धार्मिक, वैचारिक वारसा, मिलाफ आणि इतिहास सांगत दिमाखात अजूनही उभ्या आहेत. अशा वास्तू ज्यात अनेक अप्रतिम घुमट आहेत, सुंदर भित्तीचित्रे आहेत, भव्य कोरीव खांब आहेत. ज्या एक संमिश्र आणि समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार आहेत. त्याचबरोबर त्या काही शतकांच्या अंतराने धार्मिक व राजकीय वर्चस्वासाठी झालेल्या रक्तरंजित लढायांच्यादेखील मूक साक्षीदार आहेत. अशा वास्तूंपैकी एक जगप्रसिद्ध वास्तू म्हणजे तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील हाया सोफिया ही वास्तू होय. ही मशीद आहे की चर्च आहे? हा वादाचा मुद्दा अलहिदा. जगभरातील विचारवंत, समाज शास्त्रज्ञ, लेखक, निधर्मी आणि नास्तिक विचारांचे अनेक प्रथितयश लोक तसेच जगभरातील पर्यटक यांच्यासाठी ते दोन धर्मांचे आणि राजवटींचे गतवैभव आणि इतिहास सांगणारे, समृद्ध ग्रंथालय असणारे ते अनोखे संग्रहालय होते असे मान्य करत असतात. तथापि, अलिकडेच ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा एकदा मुस्लीम प्रार्थनास्थळ (मशीद) असल्याचे तुर्कस्तानचे सर्वेसर्वा एरद्वान यांनी जाहीर केले. आणि, जगभर त्यावर नाराजीच्या तर असंख्य लोकांच्या आनंदाच्याही प्रतिक्रिया उमटल्या. एकवेळ ऐक्याची प्रतिक ठरलेली हा वास्तू आता दुहीचे प्रतीक म्हणून २०२० पासून अस्तित्वात आली. इतिहासाचे अवलोकन केले असता, या वास्तूने कायमच धार्मिक-राजकीय स्थित्यांतरे पाहिली. १२व्या शतकात ही वास्तू कॅथलिक चर्च झाली. काही वर्षांतच ते पुन्हा पूर्वीचे सनातनी चर्च बनले. १४व्या शतकात काँस्टॅनटिनोपॉल, रोमन साम्राज्याचा पाडाव झाला व ऑटोमनांचा काळ सुरू झाला. त्यात दुसर्‍या सुलतान मोहमदने हाया सोफियाचे मशिदीत रूपांतर केले. पुढे त्यात ग्रंथालयाचीसुद्धा भर पडली. ही वास्तू २०व्या आणि २१व्या शतकात अगदी २०२० जुलैपर्यंत एक म्युझियम म्हणून ख्रिश्चन आणि मुस्लीम दोन धर्मांच्या तसेच बायझन्टाईन आणि ओटोमन यांच्या समृद्ध सांस्कृतिक, धार्मिक आणि त्यानुषंगिक वैचारिक वारशाची प्रेक्षणीय ओळख करून देणारी एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू होती. २०व्या शतकात १९३५ साली मात्र अतातुर्क कोमाल पाशा यांनी या मशिदीचे एका संग्रहालयात रुपांतर केले आणि जगाला तुर्कस्तानची एक उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष तसेच कोमाल समाजवादी राष्ट्र म्हणून नवीन ओळख करून दिली. या निर्णयालाच तुर्कस्तानचे अध्यक्ष एरद्वान यांच्या पक्षाने न्यायालयात आव्हान देऊन आताचा बदल घडवून आणला आहे. त्यासाठी त्यांनी देशप्रेम आणि देशाचा मुख्य धर्म याकडे सगळ्यांचे लक्ष वळवले. हा मुद्दा पेटता ठेवून देशप्रेम आणि धर्म या संबंधीच्या भावना जागृत करत लोकांची बरीच सहानुभूती मिळवली. एरद्वान हे धोरणी राजकीय नेते असल्याने त्यांनी भाषणात हाया सोफिया ही कशी तुर्कस्तानची वास्तू आहे. तसेच ती पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर मिळवली असल्याने त्यावर देशाचाच रास्त अधिकार आहे, असाही दावा केला होता. आणि, अखेर तिला मशीद घोषित करण्यात ते यशस्वी झाले. आता या वास्तूतील ख्रिश्चन चर्च व ग्रंथालयाची ओळख पुसून पुन्हा तिचे मशिदीत रुपांतर केले जात आहे. त्यांच्या या निर्णयाचे तेथील व किंबहुना मुस्लीम देशांतील सर्वच मुस्लिमांनी स्वागत केले. राममंदिराबाबत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जो हवाला दिला, तोच याच वास्तूचा आणि त्यातून सूचित केला तो तेथील रक्तरंजित इतिहासाने घेतलेला बदला. राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर हे तंत्र फार जुने आणि हुकूमीच आहे. मात्र त्याने हजारो युद्ध आणि प्रचंड रक्तपात घडवला, हा इतिहास आहे. एकविसाव्या शतकात जिथे प्रचंड क्रांती संप्रेषण आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली असली, जीवनमान सुधारले असले, शैक्षणिकदर्जा बराच उंचावला असला तरी, मानसिकदृष्ट्या माणूस अजूनही मानवतावादी विचार आणि आचरण, समानता, बंधुता, सहचर्य यापासून तितकाच दूर आहे जितके तो हजारो वर्षांपूवी& कळपात जीवन जगत असताना होता. त्यामुळे बाबरी मशीद पाडणे, त्यानंतर उसळलेल्या दंगली आणि त्यात झालेला रक्तपात पाहाता, आजही एका मोठ्या समुहाच्या मनात पुन्हा हाया सोफिया घडविण्याचा विचार येत असेल तर ती वेळीच दखल घ्यावी, अशी बाब आहे. बाबरी पाडून मंदीर बांधले. पुन्हा मंदीर पाडून बाबरी बांधू, असा तो विचार आहे. आणि, भारतासाठी हा विचार धोक्याचा आहे. केवळ मुस्लीमच नाही तर हिंदूंमधील अनेक विचारवंतांना बाबरीकांडाचा सवो&च्च न्यायालयाचा निकाल संशयास्पद वाटतो आहे. जनरेट्याच्या जोरावर हा निकाल लागला, अशी अनेकांची भावना आहे. या भावनांशी न्यायसंस्था अवगत नाही, असे नाही. परंतु, देशातील सव&च लोकांच्या भावनांना न्यायसंस्था न्याय देण्यात अपयशी ठरली, असे एकंदरित न्यायालयाच्या निकालावरून दिसून येते. मंदीर असो की मशीद असो, या वास्तू मानवी भावनांतूनच निमा&ण होत असतात. त्यामुळे त्यांच्याप्रती माणसांच्या भावना कमालीच्या टोकाच्या असतात. आज जर कुणाच्या मनात आम्ही भविष्यात राममंदीर तोडून तेथे पुन्हा बाबरी मशीद बांधू, असा विचार येत असेल तर या देशाच्या पुढील पिढीच्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल, याची कल्पनाच थरारक वाटते. ज्या पिढीने बाबरीकांडाचा रक्तरंजित काळ अनुभवला, त्यांच्यासाठी ही कल्पना भीतीदायकच आहे. कधी कधी काळ सूड उगवतो असे म्हणतात, मग तसे झालेच तर हा काळ कुणावर सूड उगविणार? हिंदूंवर की मुस्लीमांवर? तेव्हा आहे ती परिस्थिती आणि न्यायालयीन निकालाचा आदर करत दोन्हीही धमि&यांनी कटू आठवणी विसरून नव्या भारताच्या उभारणीसाठी एकत्र आले पाहिजेत. सूड उगविल्याने कुणाचेही भले होणारे नाही. हे लक्षात ठेवावे. रक्त तर दोन्ही बाजूने सांडेल!
---------------------