Breaking News

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा !

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा
बहीण म्हणून अजित पवार यांनी आपले काही दु:ख असेल तर हलके करण्याची आम्हाला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे
मुंबई :
 रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. या निमित्ताने राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात 'दादा' आळखले जाणारे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायची इच्छा आहे, असे त्यांची बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांनी व्यक्त केली आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्त डॉ. रजनी इंदुलकर यांनी 'लोकमत'शी बातचीत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधानपदी बघायचे आहे. तसेच, अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी, अशी आशा आहे, असे डॉ. रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे. याचबरोबर, बहीण म्हणून अजित पवार यांनी आपले काही दु:ख असेल तर हलके करण्याची आम्हाला संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डॉ. रजनी इंदुलकर म्हणाल्या, "दादा तुम्ही सगळ्यांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही, तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामे केली आहेत. सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात. कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चाललंय किंवा आपलं दु:ख काय आहे, ते कधीतरी शेअर करा. तुमचेही काही टेन्शन असतील ते वाटायला आवडेल. पण, तुम्ही हे आतापर्यंत केले नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आला आहात, तर हीच आमची इच्छा आहे की, आम्हा बहिणींना तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हाला संधी मिळाली तर बरं होईल."