Breaking News

कोरोनामुळे, कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले !

     INDIAN Wrestling / Kusthi / pehlwani Amazing Stunts, Never GiveUp ...

    मुंबई  : कोरोना व्हायरसवर अद्याप नियंत्रण मिळवता आले नसल्यामुळे आता कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिरही पुढे ढकलण्याचा निर्णय कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाकडून यावेळी घेण्यात आला आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांसाठी आता पुढल्या महिन्यात शिबिर घेतले जाईल. याबाबतची अंतिम तारीख 15 ऑगस्टनंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी यावेळी दिली.

    महिला कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिर लखनौ येथील साईच्या केंद्रात आयोजित करण्यात येणार होते, पण या केंद्रानजीक असलेले हज हाऊस हे कोविड सेंटर म्हणून कार्यरत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विनीश फोगाट, साक्षी मलिक व पूजा ढंढा या कुस्तीपटूंनी तेथे शिबिरास येण्यास नकार सांगितला. तसेच काही कुस्तीपटूंकडून महिलांचे शिबिर सोनीपत किंवा पटियाळा या स्थळांपैकी एका ठिकाणी आयोजित करावे अशी मागणी कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाकडे करण्यात आली. याआधी हे शिबिर जुलै महिन्यात घेण्यात येणार होते. कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले. मात्र आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ातही हे शिबिर होणार नाही.

पुरुषांचा सराव सुरू

हिंदुस्थानच्या पुरुष कुस्तीपटूंचा सराव सुरू आहे. सुशीलकुमार, रवी दहिया, दीपक पुनिया हे कुस्तीपटू छत्रसाल आखाडय़ात सराव करीत आहेत. तसेच बजरंग पुनिया व जितेंदर किन्हा हे कुस्तीपटू बंगळुरूत आगामी स्पर्धांसाठी सज्ज होत आहेत.