Breaking News

अग्रलेख - सुशांतची आत्महत्या आणि संशयाचे भोवरे !


सुशांतची आत्महत्या आणि संशयाचे भोवरे !
      अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येला 45 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर नव-नवीन खुलासे समोर येत असून, यातून अनेक संशयाचे भोवरे तयार होत आहे. हे भोवरे पार करणे, पोलिसांसमोर एक आव्हान आहे. या प्रकरणाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली ती, सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पोलिस तक्रार केली. यात त्यांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ज्यातून या प्रकरणांची तीव्रता समोर येते. सुशांतच्या व्यक्तिगत शरीररक्षकाने माध्यमांना दिलेल्या मुलाखती, सुशांतची पूर्वीची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने दिलेला जबाब, रिया चक्रवर्ती हिच्यासोबत परदेश दौरा करून आल्यानंतर त्याला दिल्या जात असलेल्या गोळ्या यावरून संशयाचे वातावरण तयार झाले आहे. सुशांतने आत्महत्या केली असली, तरी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले का, याचा आता तपास करावा लागेल.या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल 50 कोटी रुपये काढले गेले आणि फक्त गेल्या वर्षभरात 15 कोटी रुपये काढल्याचे त्यांनी म्हटले आहे.  
वास्तविक पाहता सुशांत सिंह हा एक गुणी अभिनेता होता. आपल्यामागे कोणतेही स्टारडम नसतांना देखील त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर बॉलीवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले होते. मात्र राजकारणांत ज्याप्रकारे घराणेशाही, एका विशिष्ट लोकांची मक्तेदारी होऊन बसली आहे, तशीच घराणेशाही बॉलीवूडमध्ये देखील बघायला मिळत आहे. अभिनेत्यांची मुले-मुली देखील काही दिवसांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार हे, निश्‍चित. अशावेळी आपल्या मुला-मुलींना बॉलीवूडने आणि प्रामुख्याने जनतेने स्वीकारयाला हवे. यादृष्टीने त्यांची अगोदरपासून लगबग सुरु असते. त्यामुळे बॉलीवूडच्या बाहेरच्या म्हणजेच ज्यांच्यामागे कोणतेही स्टारडम नाही, त्यांना बॉलीवूडमध्ये स्थिरावू दिले जात नाही. तसेच चांगल्या भूमिका त्यांना दिल्या जात नाही. नवीन कलाकारांचे खच्चीकरण करण्याचे काम पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्धरित्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. आणि सुशांतच्या मृत्यूनंतर या सर्व प्रकरणांना पुन्हा एकदा उजाळा मिळतो आहे, इतकेच.  सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक आरोप होतांना दिसून येत आहे. यात तथ्य किती याचा शोध पोलिसांनी घ्यायचा आहे. मात्र मुंबईमध्ये या संपूर्ण प्रकरणांचा तपास झाल्यास, अनेकांना यातून सहज सुटणे शक्य होऊ शकते. कारण बॉलीवूडचे रिलेशन आणि मुंबईतील हायप्रोफाईल पोलिसांची लागेबांधे यामुळे यातून जर कुणी आरोपी असेल, तर त्यांना सहज सुटणे शक्य होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात सुशांतच्या आत्महत्येची चौकशी, सीबीआयने करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होतांना दिसून येत आहे. सुशांतसिंहने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्या आत्महत्येचा कारणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत असून, काही दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी देखील होत आहे. मात्र, राज्य सरकारनं त्याला नकार दिलेला आहे. मात्र, बिहार सरकारनं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुशांतच्या बँक खात्यातून रियाच्या बँक खात्यात कोणतेही पैसे जमा न झाल्याची माहिती दिली. बिहार पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर तसेच सुशांतसिंहचं उत्पन्न, बँक खाती आणि कंपन्यांविषयी स्वतंत्र माहिती गोळा केल्यानंतर ईडीने रिया, तिचे कुटुंबिय आणि अन्य सहा जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अन्य एक एफआयआरदेखील ईडीच्या चौकशीचा भाग असेल, असेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे. त्यात सुशांतसिंहच्या लेखापालांनी त्याच्या खात्यात 15 कोटी रुपये कधीच नव्हते, असे म्हटल्याने संभ्रम आणखी वाढला आहे. एकीकडे मुंबई पोलिसांची भूमिका आणि सुशांतच्या वडिल आणि बिहार पोलिसांची भूमिका पाहता, यातून दीर्घकाळ संघर्ष सुरु राहणार असेच आत्तातरी दिसून येत आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये गुन्हा नोंदवल्यानंतर, तसेच रिया चक्रवर्तीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यापूर्वीच रियाने पळ काढला आहे. यातून अनेक शंका उपस्थित होत आहे. रियाच्या हेतूवर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रकारे सुशांत कोणती मेडिसीन घेत होता, त्याच्यावर कोण उपचार करत होते, याप्रकरणी अनेक शंका उपस्थित होत आहे. याप्रकरणी खर्‍या अर्थाने सखोल चौकशीची गरज असतांना, यात काही तथ्य नाही, असे विधान करणे मुर्खपणाचे ठरणारे आहे.