Breaking News

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम

Congress Leaders Letter Row: Continue As Congress President Or ...

 काँग्रेस कार्यकारिणीत ‘राहुल विरूद्ध ज्येष्ठ’ घमासान!

- भाजपशी साटेलोटे केल्याचा राहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी!

- राजीनाम्याचा गुलाम नबींचा इशारा; कपिल सिब्बलही चिडले

- प्रियंका वढेरांच्या ट्वीटनंतर सिब्बल यांनी ट्वीट हटविले

नवी दिल्ली/ खास प्रतिनिधी

काँग्रेस कार्यकारिणीत राहुल गांधींविरुद्ध ज्येष्ठ नेते असा वाद घमासान रंगला असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस कार्य समितीची सोमवारची बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर राहुल गांधी यांनी पत्र पाठवणार्‍या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेविषयीच शंका उपस्थित केली. तब्बल सात तास चाललेल्या बैठकीत अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजपशी संगनमत करून काही नेत्यांनी हे पत्र पाठवल्याचा आरोप या बैठकीत खा. राहुल गांधी यांनी केला. तसेच सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना हे पत्र पाठवण्यात आले. यावरुन राहुल गांधी यांनी संबंधित नेत्यांना अक्षरश: धारेवर धरले. राहुल गांधी यांचा हा घाव ज्येष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत राहुल गांधी यांना प्रत्युत्तरही दिले. भाजपशी साटेलोटे असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही ट्विटर करून आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी म्हणतात की, आमचे भाजपशी साटेलोटे आहे. आम्ही राजस्थान उच्च न्यायालयात यशस्वीपणे काँग्रेसची बाजू मांडली. मणिपूरमध्ये काँग्रेसची बाजू लावून धरत भाजपला सत्तेवरून खाली खेचले. गेल्या 30 वर्षात एकदाही भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही. तरीही आमचे भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप होतो, अशी खंत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.  दरम्यान, या ट्विटवरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपले ट्वीट तात्काळ डिलीटही केले. राहुल गांधी यांनी वैयक्तीयरित्या माझ्याशी संपर्क साधला. आपल्या संदर्भात आरोप केले नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे आपण हे ट्वीट डिलिट करत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. या सर्व घमासानाचा भाजप नेत्यांनी खिल्ली उडवून आनंद लुटला.

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यसमितीच्या झालेल्या बैठकीत श्रीमती सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचे निश्‍चित झाले. त्याचबरोबर पुढच्या सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिची सूत्रांनी दिली. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता पार सुरु झाली ती तब्बल सात तास चालली. बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावे, अशी मागणी केली. तर सोनियांनी आपला राजीनामा सादर केला होता.


सोनियांना पत्र लिहिणारे23 नेते भाजपशी मिळालेले!
- राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसच्या ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांकडून हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यात आले होते. त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी यांनी टीका करत हे सर्व नेते हे भाजपशी मिळालेले आहेत, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे हे नेतेदेखील खवळले असून, त्यांनी राहुल यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा पक्ष राजस्थान आणि मध्य प्रदेशात विरोधी शक्तींशी लढत होता, त्यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ होत्या. तेव्हा असे पत्र का नाही लिहिले गेले? राहुल गांधींच्या या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.


काँग्रेसची सारवासारव!

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले, असे वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केलेच नाही, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ट्विटरवर केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आहे.  बैठकीत किंवा बैठकीबाहेर कुठेही त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केलेले नाही, असेही आझाद म्हणाले.