Breaking News

पूर्वविदर्भात महापुराने हाहाकार!

- पाच जिल्ह्यांत पूरस्थिती, अनेक गावे पाण्यात

- मदत व बचाव कार्य सुरु 

नागपूर/ विशेष प्रतिनिधी

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरु होते. पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, मोठी वित्तीय व जीवितहानी झाली आहे. 

मध्य प्रदेशातील संजय गांधी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याचा मोठा फटका पूर्व विदर्भाला बसला असून,  नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पुरामुळे हाहाकार उडाला आहे. नागपुरात पेंच (ता. पारशिवनी) आणि तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे. तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पडलेला पुराचा विळखा कायम असून, निम्मे भंडारा शहर जलमय झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. गोंदिया जिल्ह्यातील 30 गावे अद्याप पुराखाली आहेत. हजारो एकर शेतातील पिकं पुराच्या पाण्याखाली आली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराचे पाणी सखल भागासह गावांमध्ये शिरल्याने एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातल्या मौदा, पारशिवनी, कामठी आणि कुही तालुक्यांतील दोन्ही नदीकाठच्या 48 गावांमधील 26 हजार 490 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. भंडारा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर तीन फूट पाणी साचले होते. वैनगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रह्मपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रह्मपुरीचे रस्ते बंद झाले आहेत. पूर्व विदर्भातील 201 गावांना पुराचा फटका बसला आहे. 61 हजार 595 नागरिकांना पुराचा तडाखा सहन करावा लागला आहे. पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी 111 मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये 10 हजार 253 जणांनी आश्रय घेतला होता. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या राज्यांमधील अनेक भागांतही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांमध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये आणि शहरांत पाणी शिरले आहे.