Breaking News

नाटेगाव शौचालय घोटाळ्याची चौकशी थांबविण्याची मागणी !

नाटेगाव शौचालय घोटाळ्याची चौकशी  थांबविण्याची मागणी 
 ( तालुका चौकशी समितीवर दाखविला अविश्वास ,तर चौकशी थांबवल्याची गटविकास अधिका-यांची प्रतिक्रिया )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
        नाटेगाव येथील ग्रामपंचायत माजी सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक व विद्यमान सरपंच प्रकल्प अधिकारी यांनी  वैयक्तिक शौचालय बांधकाम करताना संगनमत करून आर्थिक गैर व्यवहार केला असून सदर कामाची चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना अर्ज देऊन चौकशी करावी अशी मागणी केली होती प्रत्यक्षात चौकशी चालु झाली असतानाच   आता अर्जदारांनीच ही चौकशी थांबविण्यात यावी असा अर्ज गटविकास अधिका-यांना दील्याने मोठी खळबळ उडाली आहे.
        ही चौकशी थांबवावी म्हणून देण्यात आलेल्या अर्जात  म्हटले आहे की नाटेगाव शौचालय घोटाळ्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी  सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता वरिष्ठांचा कोणताही लेखी आदेश नसताना  गटविकास अधिकारी यांनी स्वतः चौकशी करणार असल्याचे स्थानिक वृत्त पत्रात प्रतिक्रिया देऊन सांगितले  तसे  वाचण्यात आले त्या मुळे अर्जदार यांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली असता विस्तार अधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पत्र अर्जदार यांना देण्यात आले मात्र अर्जदार  यांनी त्यांच्या अर्जात सदर चौकशी अन्य तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे मार्फत व्हावी अशी मागणी केली असतानाही गट विकास अधिकारी यांनी गट विस्तार अधिकारी डी.ओ.रानमाळ व बी.बी.वाघमोडे यांना चौकशी कामी आदेश दिले मात्र यापूर्वी संबंधीत अर्जदार व अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज देऊन तत्कालीन सरपंच , विद्यमान सरपंच ग्रामसेविका सौ औचित्ये, व प्रकल्प अधिकारी पालवे  यांना गावात आत्ता पर्यत झालेल्या शासनाने  अनुदान दिलेल्या शौचालयांच्या  यादीची मागणी केली मात्र ग्रामस्थ यांना सदर यादी देण्यास या सर्वांनीच टाळाटाळ केली असून आज देऊ उद्या देऊ तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी तुम्हाला यादी पंचायत समिती मध्ये पाहायला मिळेल असे तर प्रकल्प अधिकारी पालवे  यांच्या कडे मागणी केली असता तुम्हाला यादी ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळेल असे सांगून यादी देण्यास टाळाटाळ केली शेवटी ग्रामस्थांनी सदर शौचालय लाभार्थी ची यादी मिळावी म्हणून माहिती अधिकार कायद्याचा आधार घेतला मात्र तरी देखील अद्याप यादी दिली गेली नाही यादी न देण्या मागचे कारण काय ?
      विशेष म्हणजे या शौचालय घोटाळ्याचा सर्वे सुरू करण्यापूर्वी सदर यादी ग्रामस्थांच्या माहिती साठी नोटीस बोर्डावर चिटकवने आवश्यक होते ? तसे केले असते तर कोणत्या कुटुंबात किती शौचालय  मंजूर केले? व अनुदान दिले? याची माहिती झाली असती व ग्रामस्थांनी असे वादग्रस्त शौचालय पाहणी करण्याचा संबंधित पाहणी अधिकारी यांना आग्रह केला असता  मात्र चौकशी अधिकारी यांनी देखील ही काळजी घेतली असल्याचे दिसून येत नाही विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी डी.ओ.रानमाळ व ग्रामसेविका हे निमगाव खैरी या एकाच गावातील आहेत 
      यांनी ही पाहणी करताना त्रयस्थ यंत्रणा सोबत घेणे आवश्यक होते मात्र हा सर्वे करताना संबधीत ग्रामसेवक,त्यांचे पती तत्कालीन सरपंच यांचे पती व प्रकल्प अधिकारी पालवे  हेच सर्वे करत  आहेत तसेच वादग्रस्त शौचालय मिळून आल्यास संबंधित शौचालय पहाणीचा अन्य ग्रामस्थांचे सहीने पंचनामा होणे अपेक्षित होते व आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही याउलट अपूर्ण व बंद काम असलेले शौचालय असल्यास सदर लाभार्थीना लवकर दुरुस्त करून घ्यावे असे तत्कालीन सरपंच पती व ग्रामसेवक यांचे पती सांगत आहेत
अश्या प्रकारे प्रत्यक्ष लाभ धारकांची यादी लपवून ठेऊन सर्वे सुरू असून पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकारी करत असलेला सर्वे म्हणजे घोटाळा करणाऱ्याना वाचवण्यासाठी चाललेला आटापिटा आहे व या घोटाळ्यावर सोयीस्कर पांघरूण घालण्याचा प्रकार आहे लाभार्थींची यादी नसल्याने अनेक सत्य उजेडात येणार नाही असेच दिसून येते असे अर्जात म्हटले आहे अशा प्रकारे ज्यांची चौकशी करायची त्यांच्याच हातात तपास यंत्रणा देऊन गट विकास अधिकारी यांनी  चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार सुरू केला असून वरिष्ठांचा आदेश प्राप्त होई पर्यंत व अन्य तालुक्यातील तपास अधिकारी यांची नेमणूक करण्यात येई पर्यंत सदर सर्वे थांबविण्यात यावा व सदर सर्वे होई पर्यंत संबंधित ग्रामसेविका    व प्रकल्प अधिकारी पालवे  यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी आता अर्जदार ग्रामस्थांनी  केली आहे .

नाटेगाव येथील शौचालय बांधकामाची चौकशी व्हावी असा जिल्हा परिषदेकडे अर्ज दिलेला आहे त्याची माहिती साठी प्रत आमचे कार्यालयात प्राप्त झाली कर्तव्य म्हणून आम्ही  आमचे कार्यालया कडून चौकशी सुरू केली होती मात्र वरिष्ठ अधिकारी यांचे कोणतेही आदेश आलेले नाही.संबंधित गट विस्तार अधिकारी,  ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत होणारी चौकशी वरिष्ठांचा आदेश येई पर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे
--------------
                 दिलीप सोनकुसळे
गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव