Breaking News

तुफान हाणामारीत चौघांचा खून

- श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक घटना : मृतांत तिघे सख्खे भाऊ

- स्वस्तात सोने आमिषातून हत्याकांड ? एसपींचा पोलिस ठाण्यात तळ

श्रीगोंदा/ तालुका प्रतिनिधी 

गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये तुफान हाणामारीत तीन सख्या भावांसह चौघांचा निर्घृण  खून झाला. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे ही थरारक घटना घडली. घटनेनंतर तिघांचे मृतदेह नातेवाइक तरुणानेच दुचाकीवरून घरी नेले. ही घटना घडल्यानंतर काल रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह हे येथे आले. ते रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात ठाम मांडून बसले होते. तसेच, चार जणांची हत्या झाल्याने ते गंभीरतेने तपास करीत आहेत. त्यांच्यासोबतच इतर पोलिस रात्रीत एक मिनिटही झोपले नसल्याचे समजले.

अहमदनगर-दौंड रस्त्यावर विसापूर फाटा आहे. त्या भागात आदिवासी-पारधी समाजाची वस्ती आहे. तेथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कारवाई सुरू केली. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेगाव येथील आदिवासी समाजातील हे तरूण गांजा ओढण्यासाठी विसापूरफाटा येथे जमले होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. काळे व चव्हाण कुटुंबातील या तरुणांमध्ये हाणामारी सुरू झाली. यामध्ये लिंब्या हरब्या काळे (वय 22) नातीक कुंजा चव्हाण (वय 40), नागेश कुंजा चव्हाण (वय 14) व श्रीधर कुंजा चव्हाण (वय 35) यांचा मृत्यू झाला. यातील तिघे चव्हाण सख्खे भाऊ आहेत. चाकू आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या भागातील गटांत नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे घटना पाहणार्‍या ग्रामस्थांना सुरुवातीला हा नेहमीचाच प्रकार असावा, असे वाटले. या भागात स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सापळा रचून फसविलेल्या व्यापार्‍यांना लुटण्याचे प्रकार होत असतात. त्यानंतर लुटीच्या मालावरून टोळीत अपापसांत वाद होण्याच्या घटना नेहमीच्या असल्याने सुरुवातीला ग्रामस्थांनी त्याकडे कानाडोळा केला. काही वेळात तेथे आणखी काही लोक आले. त्यातील एकाने तेथील तिघांचे मृतदेह दुचाकीवरून नेले. हा तरुण खून झालेल्या तिघांचा मावस भाऊ असल्याचे नंतर सांगण्यात आले. घटनास्थळी एक मृतदेह पडून होता. तर हल्लेखोर पळून गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर काहींनी पोलिसांना याची माहिती दिली. बेलवंडी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांसह नगरहून वरिष्ठ पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुरेगाव आणि परिसरात हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. घटनेबद्दल आदिवासी वस्तीवर आणि ग्रामस्थांकडेही पोलिस चौकशी करत आहेत.


हत्याकांडाला स्वस्तात सोने आमिषाची किनार?

हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील काही व्यक्ती स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते. त्यांच्यासमेवत काही महिलाही असल्याचे समजते. त्यांच्याकडे नोटांनी भरलेली बॅग होती. ठरलेल्या व्यवहारात पैसे देवून सोने घेण्याचे ठरले होते. सोन्याच्या नावाखाली ड्रॉप करण्याचा फंडा अनेक वर्षांपासून श्रीगोंद्यात सराईतपणे सुरु आहे. आपण फसले जावू शकतो याची शक्यता असल्याने समोरुन सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीही तयारीत होत्या. पैसे घेवून सोने देण्यासाठी काही व्यक्ती समोर आले आणि इतर दबा धरुन बसले होते. पैशाची बॅग दिसली की ती हातातून हिसकावली आणि पळू लागले. त्याचवेळी सोने घेण्यासाठी आलेल्या एका उंच व्यक्तीने हातात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत ज्याने बॅग हिसकावली त्यावर वार केला. तो ओरडल्याने लपून बसलेले काही व्यक्ती समोर आले. त्यावेळी त्या चाकुधारी व्यक्तीने त्यांच्यावरही सपासप वार सुरु केल्याने इतरांनी तेथून धूम ठोकली. सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी लगेच जवळच लावलेल्या त्यांच्या वाहनाकडे धाव घेतली आणि तेथून पसार झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांचे एक पथक त्या आरोपींच्या शोधासाठी गेल्याचीही माहिती आहे.