Breaking News

मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस !

www.skymetweather.com/content/wp-content/upload...

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.

    तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.


मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

   वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.