Breaking News

१३ ऑगस्ट पासून १८ ऑगस्ट पर्यंत राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र हे आंदोलन होणार !१३ ऑगस्ट पासून १८ ऑगस्ट पर्यंत राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र हे आंदोलन होणार !
 
शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांची माहिती !
पारनेर / प्रतिनिधी :-
            महाराष्ट्र राज्यातील दुध‌‌‌ उत्पादक शेतकऱ्यांचे दुध दरवाढीच्या मागणीसाठी लेटर टू सीएम हे आंदोलन १३ ऑगस्ट पासुन १८ ऑगस्ट पर्यंत राज्यभर करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी सोमवारी राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची अॉनलाईन बैठक झाल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पञकारांना देत असताना सांगितले.
              देठे पाटील म्हणाले की , मार्च महिन्यापासुन राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन करण्यात आल्याने दुधाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने दुधदरात मोठी घसरण झालेली आहे.याबाबत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी वेळोवेळी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने दिली तसेच राज्यभर १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलने देखील केली परंतु तरी देखील राज्य सरकार बधत नसल्याने सोमवारी सकाळी ११.०० वा. राज्यातील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत , किसान सभेचे राज्य राज्यसरचिटणीस डॉ अजित नवले , शेतकरी नेते अनिल देठे पाटील , रोहिदास धुमाळ , मधुकर म्हसे , धनंजय धोरडे , महेश नवले,  सुरेश नवले आदी शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत राज्यात १३ ऑगस्ट पासुन १८ ऑगस्ट पर्यंत लेटर टू सीएम हे आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.या आंदोलनादरम्यान राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आपापल्या गायींच्या गोठ्यातुनच मोठ्या प्रमाणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र तसेच ई-मेल पाठवून राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्यां व्यथा मांडणार असुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाच्या महासंकटात आधार देण्यासाठी दुधाला प्रतिलीटर 30 रू.दर देण्याची मागणी करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक स्वरूपाचे व संख्येचे आंदोलन करण्यास मर्यादा येत असल्याने राज्य सरकार जाणीवपूर्वक दुध दराबाबतचा तिढा सोडवण्यासाठी विलंब करत असल्यानेच दुध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागत आहे.आतापर्यंत राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु राज्य सरकार जर शेतकऱ्यांच्या संयमाची परिक्षा घेणार असेल तर ते चुकीचे आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुध दरवाढीच्या संदर्भात सकारात्मक भुमिका घेतली नाही तर माञ संयमाने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा दुध उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही.असा इशाराही त्यांनी या दरम्यान दिला.

      राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुधप्रश्नाबाबत सरकारमधील काही नेते वास्तववादी माहिती देत नाहीत तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघांचेच हित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असल्यानेच  दुध दराबाबतचा निर्णय घेण्यात विलंब होत आहे.
              -- अनिल देठे पाटील
                    शेतकरी नेते