Breaking News

वनवास संपला की सुरू झाला...!

वनवास संपला की सुरू झाला...!
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र यांच्या भव्य मंदीर भुमीपुजनसोहळ्यानंतर देशभरातील हिंदू समाजात चैतन्याचे स्फुल्लींग चेतल्याचे पहायला मिळत आहे.या शुभ क्षणाच्या आनंदावर विरजण टाकून तमाम रामभक्तांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत.माञ म्हातारीच्या मृत्यूपेक्षा काळाचं सोकावणं अधिक घातक सिध्द झाल्याचा इतिहास पावलापावलावर दिसतो.म्हणून या सोकावणाऱ्या काळाच्या मुसक्या बांधायचे कर्तव्य स्वतंञ भारताचा नागरीक म्हणून पार पाडावेच लागेल.त्याच कर्तव्यापोटी अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या भव्य राममंदीर शिलान्यास सोहळ्याच्या निमित्तानं रामचंद्रांचा वनवास जसा सांगीतला जातोय तसा तो संपला आहे का? की नव्याने प्रभूंच्या वाट्याला वनवास सुरू झाला? हा सवाल अस्वस्थ करीत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब! अवघे भारत वर्ष आज ५ आॕगस्ट या दिवशी आपले शतशः ऋणी आहे.आपल्या अथक परिश्रमानंतर अयोध्येत आमच्या मर्यादा पुरूषोत्तम प्रभुरमचंद्राचे भव्य मंदीर आता उभं राहणार आहे.तब्बल पाचशे वर्ष कोंडलेला प्रभूंचा  श्वास आपण मोकळा केला.रामाचा पाचशे वर्षाचा वनवास खऱ्या अर्थाने आपण संपवला. आता या देशात रामराज्य अवतरलंय.

*सहा डिसेंबर 1992 ते 5 ऑगस्ट 2020 या 28 वर्षांच्या वनवासानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने अयोध्येचे प्रभू रामचन्द्राचा वनवास संपला अशी भारत वर्षातील रमभक्तांची भावना झाली आहे.खरे तर हा  28 वर्षाचा वनवास नाही. १५२८  ते २०२० असा हा ४९२ वर्षाचा वनवास  एका भुमीपुजन सोहळ्याने संपुष्टात आला आहे. दिर्घकालिन संघर्षानंतर प्रभू रामचंन्द्राचा श्वास मोकळा झाला आहे. प्रचंड द्वेष भावनेतून या देशातील मंदिरांना उध्वस्त करण्याचा एक वेगळा इतिहास आहे. परंतू भारतीय संस्कृतीत पुराण, वेदांचे पावित्र्य नष्ट करू शकेल अशी कोणतीही ताकद या पृथ्वीतलावर नाही. त्या शक्तीमुळेच  प्रभू रामचंन्द्राच्या जन्मभूमित पुननिर्माणाचा भव्य दिव्य सोहळा संपन्न  झाला  या भूमिपूजन सोहळ्याचे स्वागत काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी केले. हे भारत वर्षाच्या सांस्कृतिक परंपरेला शोभणारे पाऊल आहे.  प्रभू रामचन्द्र हे कुणा एका संप्रदायाची किंवा पक्षाची जहागीरी नाही..  हिन्दुस्थानच्या भूमिवर असलेल्या समस्त मानव जातीचे प्रभूरामचन्द्र आराध्य आहेत. शम्बुक पासून शबरी पर्यंत आणि माता कैकई पासून वनवासाला कारणीभूत असलेल्या मंथरेपर्यंत इतकेच नव्हे तर सीतामातेचे अपहरण करणार्‍या ब्रम्हविद्या निष्णात रावणापर्यंत कुणाचाही द्वेष न करणार्‍या मर्यादा पुरूषोत्तमाने बाबरालाही माफ केले असावे. संयम आणि मर्यादांचे कुठे उल्लंघन होणार नाही अशा या अयोध्येच्या राजाने राज्यातील सामान्य नागरिकाने उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सुध्दा सीतामातेला अग्नीपरीक्षा देण्याचे आदेश केलेत. त्यामुळे जात, पात, धर्म, पंथ, उच्च, निच, लहान, मोठा असा कोणताही भेद नसलेली दृष्टि असलेल्या मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंन्द्राच्या अयोध्येतील जन्मस्थळाचा सुक्ष्म अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने प्रभू रामचन्द्राचे ‘अस्तित्व’ व त्यांचे ‘जन्मस्थळ’ मान्य केले,म्हणून अयोध्येतील राममंदीर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपाचा अस्मितेचा विषय नाही, तर या भारत भूमिवर निवास करणार्‍या प्रत्येक माणसाच्या अस्मितेच्या विजयाचा प्रश्न आहे.  एका अर्थाने बाबराला सूचलेल्या पापबुध्दीचा विचारांवर मिळालेला हा विजय आहे. त्याचे प्रायाश्चित आता झाले, कोणत्याही समाजाचा द्वेष करण्याचा इथे मुद्दा  नाहीच.राजे शिवछञपती पासून तमाम मराठेशाही राणाशाहीशी संबंधित  राजे राणा सम्राटांनी मोगल साम्राज्यांशी दिर्घकाळ  केलेला  संघर्ष  कुणा जाती धर्माच्या  विरोधात नव्हता, तर मातृभूमिच्या रक्षणासाठी अन्याय, अत्याचाराच्या विरोधातील हा संघर्ष होता. हा संघर्ष हिन्दू विरोधी मुसलमान असा नव्हताच. तसा राहिला असता तर महाराणा प्रताप, शिवाजी महाराज्याच्या तोफखान्याचे प्रमुख मुसलमान सरदार असल्याची नोंद इतिहासाने कधी घेतलीच नसती.. म्हणून आजचा अयोध्येतील रामजन्मभूमि भूमिपूजनाचा सोहळा हा इतिहासातील अन्याय, अत्याचारावर विजयाचा सोहळा आहे. 
या सोहळ्याचे आम्ही तितक्याच उदार मनाने स्वागत करतो,आम्ही हिंदू आहोतच.आमच्या हिंदूत्वाची परिक्षा देण्यासाठी आम्हाला कुण्या रेशीम बागेत जाण्याची गरज नाही.आमचे हिंदूत्व बेगडी नाही सहिष्णू हिंदूत्वाचे आम्ही खरे पुरस्कर्ते आहोत.आमचे हिंदूत्व कुण्या खानाची खाण्यावरून हत्या करण्याचं पाप करायला प्रवृत्त करीत नाही. ताक मागायला जायचे आणि भांडे लपवायची संस्कृती आमची नाही. इतिहासात जे घडले ते सत्य आहे. त्यावर देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेच्या घटनापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या देशाच्या घटनेवर, या देशाच्या कायदा आणि सुव्यस्थेवर आमचा विश्वास आहे. . व्यक्ति स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आमच्या घटनेत आहेच. बाबरी मशिदीच्या खोदकामात पुरातत्व विभागाला सापडलेले अवशेष, इतिहासातील 1528 ते 2017 पर्यंतचे सर्व घटनाक्रम, बारकाईने 17 वर्ष अभ्यास करून लिब्रहान आयोगाने सरकारला सोपविलेला अहवाल या सर्व घटनाक्रमांचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्वांनी मान्य केला पाहिजे. धर्मनिरपेक्ष भारतात या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. श्रेय देण्याचा आणि घेण्याचाही प्रश्न नाही. हा दिर्घकालिन लढा होता. तो लढतांना कुणाचा संयम सुटला ही असेल. परंतू अधिकांश लढाई ही न्याय संस्थेच्या माध्यमातून लढली गेली. या लढाईत 1853 मध्ये ब्रिटीश सरकारने दोन्ही समुदायांना दिलेली प्रार्थनेची परवानगी, 1885 मध्ये महंत रघुवर दास यांनी सर्वांत प्रथम न्यायालयात दाखल केलेली याचिका, 1949 पासून बंद झालेली नमाज आणि सुरू झालेली रामलल्लाची पूजा, 1961 मध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केलेली याचिका, 1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने विवादित स्थळी पुजा करण्यासाठी दिलेली परवानगी, 1989 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी बाबरी मस्जिदीत शिलान्यास करण्यासाठी दिलेली परवानगी, 1990 मध्ये भाजपा अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या निघालेली रथयात्रा, मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मस्जिदी शेजारील 2.77 एकर अधिग्रहीत केलेली जमिन, आणि 6 डिसेंबर 1992 मध्ये कार सेवकांनी अयोध्येतील बाबरी मशिदीचा पाडलेला ढाचा, त्यानंतर झालेली दिर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया हा सर्व घटनक्रम चुकीच्या पध्दतीनेही मांडता येवू शकतो. आणि ऐतिहासिक संदर्भातून अधिकांश भारतीयांच्या भावनांचा, अस्मितेचा अभ्यास करून ही मांडता येवू शकतो. अयोध्येतील लढाई ही सत्याने, अन्याय अत्याचारावर मिळविलेला विजय या अर्थाने पाहिली पाहिजे.इथपर्यंत आम्ही आजच्या या सोहळ्याचे खुल्या दिलाने स्वागत करतो..नरेंद्र मोदी किंवा अन्य संघोट्या इतकाच आनंद आम्हालाही होतोय,जो आमच्या अंतापर्यंत आमच्यात तो कायम दिसेल.बेगडी हिंदूत्ववाद्यांप्रमाणे  आमचा आनंद प्रासंगिक असणार नाही.आणि म्हणूनच इतरांच्या नजरेत प्रभू रामचंद्रांचा वनवास संपल्याची भावना जागली असली तरी आमचं मन माञ थोडं अस्वस्थ झालं आहे.प्रभु रामचंद्रांच्या मंदीर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या देशात प्रभु रामचंद्रांना दैवत मानणारे सरकार सुदैवाने केंद्रस्थानी सत्तेवर आहे.म्हणूनच आपल्या आदर्श दैवताच्या आदर्श वाटेवर चालत या देशात खऱ्या अर्थाने रामराज्य आणण्याची जबाबदारी सरकारच्या खांद्यावर येऊन पडली आहे.जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून राजकारण करणे प्रभू रामचंद्रांना कदापी सहन होणार नाही.कुणाच्या चुल्यापर्यंत जाऊन पातेल्यात काय शिजतंय हे पाहण्याची आता सोय नाही.कारण  प्रभुरामांच्या राजनितीत ते बसत नाही.अशा अनेक गोष्टींवर भाजपाला अंकूश ठेवावा लागेल.अन्यथा प्रभुरामचंद्रांना पुन्हा नव्याने वनवासात गेल्याची भावना अस्वस्थ करीत राहील.