Breaking News

आदिवासी भागात स्वातंत्र्यानंतरही आऊट ऑफ कव्हरेज, मोबाईल नेटवर्कसाठी डोंगरांचा आधार.

आदिवासी भागात स्वातंत्र्यानंतरही आऊट ऑफ कव्हरेज, मोबाईल नेटवर्कसाठी डोंगरांचा आधार.
राजूर प्रतिनिधी ।  भगवान पवार 
         अकोले तालुक्यातील आढळा नदी खोऱ्यातील समशेरपूर जिल्हा परिषद गटातील सांगवी हे दाट लोकवस्तीचे खेडेगाव या गावाच्या चोहोबाजूने डोंगररांगा आहेत. दगडवाडी, घाटाखालची वाडी, पिंपळदरावाडी, कोटम दरी, गारठेचीवाडी, परदेशवाडी, तातळे वस्ती(पठार) आणि मुख्य गाव सांगवी असा सांगवी गावचा मोठा विस्तार असून लोकसंख्या सादरणपणे ४ हजाराच्याही पुढे आहे. नाशिक, सिन्नर, समशेरपूर, घोटी -टाकेद, ठाणगाव यांसारख्या मुख्य बाजारपेठा या गावाला जवळ असल्याने येथे प्रगतशील शेती केली जाते. या भागात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत. न्यू इंग्लिश स्कूल सांगवी -१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -४ , अंगणवाडी ३ , प्राथमिक आरोग्य उपकेंद्र -१ आहेत नोकरदार बांधवांची संख्या खूप असून येथील बांधव नोकरी निमित्ताने शहरी भागात वास्तव्य करून आहेत. गावातील ग्रामस्थ व गावापासून दूर राहणारे बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी सुसंवाद होण्याचे माध्यम आधुनिक साधन म्हणजे मोबाईल. मात्र स्वातंत्र्यानंतरही या गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज उपलब्ध नाही. 
         पूर्वेला केळी रुम्हणवाडी, दक्षिणेला कोंभाळणे, पश्चिमेला खिरविरे, उत्तरेला एकदारे-पेढे वाडी ही गावे असून या गावांत मोबाईल कंपनीचे टॉवर आहेत. मात्र डोंगरांच्या खोलगट भागात सांगवी गाव विसावले असल्याने येथील मोबाईल रेंज सांगवी गावात पोचू शकत नाही. आज कोरोना महामारीच्या काळात शाळा, कॉलेज बंद आहेत, मात्र शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणाला येथे अडचण होत आहे. मोबाईल रेंजचा शोध घेण्यासाठी येथील विदयार्थी , शिक्षक , पालक यांना दररोज केळी रूम्हणवाडी किंवा डोंगरावर जावे लागते. गावात एखादी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास डॉक्टर किंवा १०८ नंबरच्या अँब्यूलन्सला तातडीने कळविण्यासाठी नेटवर्क नाही. शहरी भागातील बांधवांना सुख - दुःखाच्या क्षणी अर्जंट निरोप पोचवायचा असेल तर शेजारच्या गावात फोन करून निरोप पाठवावा लागतो. शेतकरी प्रगतिशील शेती करतात मात्र या प्रगत जमान्यात त्यांना बँकेचे व्यवहार , नवनवे शोध , नवी शेती विषयक माहिती मिळविण्यासाठी नेटवर्कच नाही. त्यामुळे जगाचे शेती विषयक प्रगत ज्ञान , बाजारभाव  शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. या गावात मोबाईल टॉवर उभारणीसाठी जागा मोठया प्रमाणात उपलब्ध असून कोणीही जागा देण्यास तयार आहे. मात्र कोणतीही मोबाईल कंपनी या भागाशी अदयापही संपर्क करताना दिसत नाही. राजकीय दृष्टीने सांगवी गाव आढळा परिसरात महत्वपूर्ण असून आतापर्यंत सांगवी गावाचे पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा , खासदारकी या राजकीय व्यवस्थेत सांगवी गावाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. शैक्षणिक , राजकीय , सामाजिक सर्व अंगांचा विचार केला तर गाव प्रगतीमान असून तालुक्याशी सुसंवाद साधण्यासाठी मात्र नेटवर्क नाही.
            तालुक्यातील कोणतीही व्यक्ती काही कामानिमित्त सांगवी परिसरात आली तर कोणाशीही रेंज नसल्याने संपर्क साधू शकत नाही किंवा आपल्या नातेवाईकाला फोन करून शोधू शकत नाही . ही खूप मोठी अडचण आहे. यावर शासकीय यंत्रणेने विचार करून कोणत्याही मोबाईल कंपनीचा एक टॉवर येथे उभा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ वारंवार करत आहेत. एखादा विदयार्थी बाहेर गावी शिक्षणास गेला व त्याला काही समस्या निर्माण झाली तर तो किंवा त्याचे पालक एकमेकांशी संपर्क करु शकत नाही. काही वेळा रस्ते अपघातात समस्या निर्माण झाली तरीही योग्य वेळी घरच्यांपर्यंत निरोप पोचवणे अवघड होऊन बसते. रेंजच नसल्याने सांगवी गाव आजही बाहय प्रगत ज्ञानापासून अंधारातच आहे. राजकीय नेतृत्वाने केवळ राजकारणापुरते लक्ष देण्याऐवजी सर्वांना सुसंवाद साधता येईल या साठी तातडीने मोबाईल टावरची व्यवस्था करावी. जो राजकीय नेता वैयक्तिक लक्ष घालून ही समस्या सोडवेल त्याला मोठा फायदा आहे .सरकारी यंत्रणा, अकोले तहसिल यांनी ही योग्य पाठपुरावा करून या भागाची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे . मात्र कोणालाही याचे देणे -घेणे नाही. तसे घडत नसेल तर दिवसभर रेंज साठी डोंगराची पायपीट चालूच राहील . विदयार्थी -शिक्षक ऑनलाईन शिक्षण घेऊच शकत नाही. येथील ग्रामस्थ कोणीतरी मोबाईल टॉवरची सुविधा घेऊन येईल अशी स्वातंत्र्यानंतरही एखादया चातक पक्षाप्रमाने वाट पाहत आहेत.