Breaking News

नगरमध्ये कोरोना रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोरोना रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसर्‍या
मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

- नगरमधील कोरोनाची स्थिती गंभीर


अहमदनगर/ प्रतिनिधी
नगर शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. उडी मारल्यामुळे रुग्णाला जबर मार लागला होता. त्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारच्यावेळी त्याची प्राणज्योत मावळली. ३२ वर्षीय हा रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे.
या कोरोना रुग्णावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी रात्री तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना निदर्शनास येताच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७ हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यातच मंगळवारी पहाटे नगर शहरातील सुरभी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास येताच हॉस्पिटमधील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केल्याच्या प्रकाराने नगर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.