Breaking News

शिवसेना वसाहतीतील थरार, थोरल्यानं दारूच्या नशेत धाकट्याला संपवलं !

अकोला : 

     थोरल्या भावानं दारूच्या नशेत धाकट्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जुने शिवसेना वसाहतमधील अंबिका चौकात घडली.

मिळालेली माहिती अशी की, जयकुमार मुरलीधर मोरे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. तर अरूण मुरलीधर मोरे असं आरोपीचं नाव आहे. अंबिका चौकात राहाणाऱ्या अरूण मोरे याने दारूच्या नशेत जयकुमार मोरे याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. जयकुमा जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. 

     स्थानिक नागरिकांनी जयकुमार याला रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच जयकुमारचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी अरूण मोरे याला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून जयकुमार याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या प्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी अरूण मोरे याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार प्रकाश पवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.