Breaking News

शेतकरी कुटुंबातील मुलगी ते देशाचं नाव उज्वल करणारी धावपटू : गोल्डन गर्ल हिमा दासचा प्रवास !

शेतकरी कुटुंबातील मुलगी ते देशाचं नाव उज्वल करणारी धावपटू : गोल्डन गर्ल हिमा दासचा प्रवास
       तिला लहानपणापासून खेळाची खूप आवड होती. खेळताना ती खूप वेगात धावायची. तिचं हेच वेगात धावणं पुढे चालून  इतिहास घडवेल याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. फिनलँड येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अंडर -२० अथेलेटिक्स चँपियनशिप स्पर्धेच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली. ती खेळाडू म्हणजे गोल्डन गर्ल हिमा दास होय. एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीनं इथपर्यंत मजल मारणं ही सोप्पी गोष्ट नव्हती. हिमाचा हा संपूर्ण प्रवास तिच्या खेळाप्रमाणेच रोमहर्षक राहिला आहे. 
 
आसाम राज्याच्या नागाव जिल्ह्यातील ढिंग या छोट्याशी गावी ९जानेवारी २००० रोजी हिमाचा जन्म झाला. हिमा ६ बहीण-भावांपैकी सर्वात लहान आहे. हिमाच्या घराजवळच तिचे चुलत भाऊ आणि काही मुलं फुटबॉल खेळायची. लहानगी हिमा त्यांचा खेळ बारकाईने पहायची. लवकरच ती देखील या फुटबॉल खेळणाऱ्या मुलांमध्ये सहभागी झाली. ती शाळेमध्येही फुटबॉल खेळायची. फुटबॉल खेळण्यासाठी खूप धावावं लागायचं. यामुळे बरीच मुलं लवकर थकून जायची. पण हिमा मात्र वेगात धावून बॉलचा पाठलाग करायची. हिमाचं हे धावणं पाहून इतर मुलं अचंबित व्हायची.  एका शिक्षकाने तिची ही धावण्याची क्षमता पाहून तिला धावण्याचा सराव करण्याचा सल्ला दिला. हिमाने हा सल्ला मनावर घेतला आणि ती धावण्याचा सराव करू लागली. धावण्यासाठी तिला कोणतंही मैदान उपलब्ध नव्हतं. अशा परिस्थितीत तिनं  शेतातच धावण्याचा सराव सुरू केला. हा सराव सुरू केला तेव्हा ती फक्त १३ वर्षाची होती.  स्थानिक पातळीवर होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत ती भाग घेऊ लागली. यामध्ये तिला चांगलं यश मिळालं. यानंतर तिने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला. येथेही तिने घवघवीत यश मिळवलं. तिचं वेगात धावणं आणि हे यश पाहुन गावकरी तिला 'ढिंग एक्सप्रेस' म्हणू लागले. हिमाला आता या स्पर्धेत अजून मोठी उंची गाठायची होती पण शेतकरी असलेले वडील धावण्याच्या प्रशिक्षणासाठी लागणारा खर्च पेलू शकत नव्हते. तिने मात्र धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचं सोडलं नाही. तिने गुवाहाटी येथे झालेल्या स्टेट चँपियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. यानंतर तिची ज्युनिअर नॅशनल चँपियनशिप स्पर्धेत निवड झाली. आतापर्यंत तिने धावण्याचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतलं नव्हतं. मोठ्या स्पर्धेचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही १००मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती फायनलपर्यंत पोहचली. मात्र यावेळेस कोणतेही पदक तिला मिळाले नाही. ती खूप निराश झाली. त्यामुळे येथेच एका सुंदर करिअरचा दुःखद शेवट होऊ शकला असता पण प्रशिक्षक निपुण दास यांनी असं होऊ दिलं नाही. हिमाचं धावणं पाहून निपुण प्रभावित झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर निपुण हिमाच्या घरी गेले आणि तिच्या कुटूंबियांना हिमाला प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला पाठवण्याची विनंती केली.  तिच्या प्रशिक्षणाचा खर्च हिमाचे कुटुंबीय करू शकत नव्हते. अशावेळी प्रशिक्षक निपुण दास यांनीच तिचा खर्च करण्याच ठरवलं. तिच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. कुटुंबाने प्रशिक्षणासाठी परवानगी दिली. गुवाहाटीत स्टेडियमजवळच तिच्या राहण्याची सोय करण्यात आली. आता हिमा गुवाहाटी येथील स्टेडियमवर धावण्याचा सराव करू लागली. हिमा देशासाठी धावणार होती. ती राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. 
 
२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिमाची निवड झाली. ४ ते १५ एप्रिल दरम्यान ही स्पर्धा होणार होती आणि त्याच दरम्यान हिमाच्या १२वी बोर्डची परीक्षा होती. कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळण्याची संधी ४ वर्षांतून एकदाच मिळणार होती तर बोर्ड परीक्षा पुढील वर्षीही तिला देता येत होती. तिने खेळण्याचा पर्याय निवडला. कॉमनवेल्थमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती सहाव्या स्थानावर राहिली. पुढील वर्षी झालेल्या १२वी बोर्डच्या परीक्षेत हिमा फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. 
 
जुलै २०१८मध्ये फिनलंड येथे वर्ल्ड अंडर -२० चँपियनशिप या स्पर्धेत हिमाने इतिहास घडवला. ४००मीटर धावण्याच्या स्पर्धेत ५१.४६ सेकंद वेळात तिनं सुवर्णपदक पटकावलं. हिमाचा हा खेळ रोमहर्षक होता. पहिल्या ३००मीटरपर्यंत हिमा खूप मागे होती. मात्र पुढील १०० मीटरमध्ये हिमाने सर्वांना मागे टाकलं. हीच हिमाची खासियत आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे हिमा दास प्रथमच चर्चेत आली. सुरवातीच्या काळात हिमाला धावण्यासाठी चांगले शूज नव्हते. कमी दर्जाचे शूज वापरून ती धावत होती.पण या यशानंतर तिला सप्टेंबर २०१८मध्ये स्पोर्ट शूजमधील नामांकित कंपनी आदिदासने ब्रँड अँबेसिडर बनवलं. हिमाने घेतलेल्या मेहनतीचं हे फळ होतं. 
 
यानंतर जुलै २०१९मध्ये तिने पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केली. युरोपमध्ये झालेल्या धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये तिने १९ दिवसांत ५ सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे सर्व भारतीयांनी तिच्यावर अभिनंदनाच वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून तिच्या कामगिरीचे कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ढिंग एक्सप्रेस आता गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जातेय.