गोरगरिबांना अगदी स्वस्तात मिळणार कोरोना लस! - गूड न्यूज - सिरम इन्सिट्यूटची बिल गेटसह आंतरराष्ट्रीय संस्थांशी भागिदारी - बिल गेट देणार १५०...
गोरगरिबांना अगदी स्वस्तात मिळणार कोरोना लस!
- गूड न्यूज
- सिरम इन्सिट्यूटची बिल गेटसह आंतरराष्ट्रीय संस्थांशी भागिदारी
- बिल गेट देणार १५० मिलियन डॉलर्सचा निधी
- लसीची किंमत केवळ २२५ रुपये राहण्याची शक्यता

पुणे/ विशेष प्रतिनिधी
लवकरात लवकर कोरोना लस तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्यासाठी सिरमने देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेने आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आता आणखी एक पाऊल उचलले आहे. जीएव्हीआय या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी २०२१ पर्यंत १०० दशलक्ष कोरोना लशीचे उत्पादन करतील. या लशीची किंमत जास्तीत जास्त ३ यूएस डॉलर म्हणजे फक्त २२५ रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधी निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास १४० कोरोना लशींवर काम सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत पुढचे एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचे सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाबासारखे आजार आहेत, त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी दिलेला आहे.
---
कदाचित लसीची गरजही पडणार नाही!
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलाॅजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाची लस येईल मात्र कदाचित या लशीची गरजही पडणार नाही, असा दावा केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, की सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल, अशी मला आशा आहे, असेही त्या म्हणाल्या. ही लस येईपर्यंत मोठ्या प्रमाणात सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल, असा विश्वासही अनेकांना वाटतो आहे.