Breaking News

शिवसेनेच्या दिवसभरात दुसऱ्या खासदाराला कोरोनाची लागण!

 शिवसेनेच्या दिवसभरात दुसऱ्या खासदाराला कोरोनाची लागण!


अहमदनगर :
 अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या पत्नी आणि डॉक्टर मुलीला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच कोल्हापूरचे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा.संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार असून काल खासदार लोखंडे यांना त्रास जाणवू लागल्याने श्रीरामपूर येथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलीचीही रॅपिड टेस्ट करण्यात आली असता तीही टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे खासदार लोखंडे यांचे चिरंजीव डॉक्टर चेतन लोखंडे यांनी सांगितले आहे.

खासदार लोखंडे हे सध्या त्यांच्या निवासस्थानीच असून यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अलीकडच्या काही दिवसांत जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन खासदार लोखंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.