Breaking News

नेतृत्व बदलासाठी काँग्रेसमध्ये खदखद वाढली!

नेतृत्वात आता तरी बदल करा!

- 23 ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र

- तरूणांचा मोदींना पाठिंबा काँग्रेससाठी चिंताजनकनवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी 

काँग्रेसच्या राजकीय घसरणीवर पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात नेत्यांकडून पक्षसंघटनेत वरपासून ते खालपर्यंत मोठे बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सोनिया गांधी यांना पत्र लिहणार्‍या या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकिरिणीचे अनेक सदस्य आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत बदल घडण्याची शक्यता आहे.

या पत्रात संबंधित नेत्यांनी गेल्या सहा वर्षात भाजपने चांगली कामगिरी केल्याची कबुली दिली आहे. देशातील तरुण नरेंद्र मोदी यांनाच मत देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यात घट होत असून, तरुणांचा पक्षावरील विश्‍वास उडत चालला आहे. ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण 15 दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सूचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोमवारी होणार्‍या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या पत्रात काँग्रेस पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. हे पत्र पाठवणार्‍या 23 नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, खासदार विवेक तनखा, मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, संदीप दीक्षित, भूपिंदर सिंह हुडा आदी नेत्यांचा समावेश आहे.


जबाबदारी घ्या अन्यथा पक्षातील लुडबूड थांबवा,

काँग्रेस नेत्यांनी राहुल बाबांना सुनावले!

कोणतीही जबाबदारी न घेता पक्ष आपणच चालवित असल्याचा देखावा उभे करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात काँग्रेसमधीलच एक गट कार्यान्वित झाला आहे. राहुल गांधी यांनी एक तर पक्षात जबाबदारी घ्यावी, अन्यथा पक्षातील लुडबूड थांबवावी असे या नेत्यांनी म्हटले आहे.


हे तर राहुल गांधींच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र - संजय निरुपम

काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सडकून टीका केली. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.