Breaking News

श्रीगोंद्यातील चौघांच्या हत्याकांडप्रकरणी जळगावातील पाच जणांना अटक

- स्वस्तातील सोन्याच्या वादातून क्रूर हत्या

- जळगावातील पाच आरोपींत दोन महिलांचा समावेश!

Jalgaon connection of the murder of 'those' four in Shrigonda ..... | श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

श्रीगोंदा/ तालुका प्रतिनिधी 

स्वस्तातील सोन्याच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे चार जणांची क्रूर हत्या करणार्‍या पाच संशयितांना जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात दोन महिलांचाही समावेश आहे. वरिष्ठ पोलिस सूत्राने याबाबतची माहिती दिली.

श्रीगोंद्यातील काही जणांनी जळगावच्या हरिविठ्ठल नगरातील काही जणांना कोट्यवधी रूपयांचे सोने स्वस्तात देण्याचे आमीष दाखविले होते. यावेळी त्यांनी सोबत शस्त्रे देखील घेतलेली होती. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ गुरूवारी सायंकाळी त्यांची भेट झाली. याप्रसंगी समोरच्यांनी जळगावच्या लोकांना बनावट सोने देऊन त्यांच्या कडील पैशांची बॅग घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात जळगावच्या लोकांनी आपल्याकडील हत्यारांनी वार करत चौघांचा खून केला. या हाणामारीत सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण (40), नागेश कुंजीलाल चव्हाण (16), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (35) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (22) यांचा खून झाला. दरम्यान, पोलिस पथकांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना घटनास्थळी ओळखपत्र आणि एटीएम कार्ड मिळाले. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहोचले असल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने नगरच्या पोलिस अधीक्षकांनी स्वतः जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना याबाबत संपर्क केला व घटनेची माहिती दिली. जळगाव एसपींनी तेथील एलसीबीचे निरीक्षक बापू रोहम यांच्याकडे ही जबाबदारी सोपावली. एलसीबीच्या पथकाने कसून तपास करत जळगावातल्य हरीविठ्ठल नगरातील नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय 22); कल्पना किशोर सपकाळे (40); आशाबाई जगदीश सोनवणे (42); प्रेमराज रमेश पाटील (22) आणि योगेश मोहन ठाकूर (22) या पाच संशयितांना शनिवारी सकाळी अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिन्ही पुरूष हे बाविशीतले तर दोन महिला चाळीशीतल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश यादव यांनी स्वतः लक्ष घालून अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

-------------------