Breaking News

कोरोना विलगीकरण कक्षामध्ये रोटेशन पद्धतीने नेमणुका देण्याची मागणी !

कोरोना विलगीकरण कक्षामध्ये रोटेशन पद्धतीने नेमणुका देण्याची मागणी 
नेवासा तालुका प्रतिनिधी 
      राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९ )चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदयाच्या अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोव्हिड १९  वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावरून केल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाभर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे ,याठिकाणी संशयित व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंद घेणे, भोजनाची व्यवस्था पाहणे इत्यादी कामकाज करण्यासाठी काही तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तथापि पुन्हा पुन्हा त्याच शिक्षकांना अतिरीक्त शिक्षक उपलब्ध असतानाही सदर कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.          कोरोना महामारी च्या अनुषंगाने सर्वच शासकीय यंत्रणा आपापल्या परीने शासनाला मदत करत आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षकही उत्कृष्ठपणे कामकाज करत आहेत. तथापि सदर कामकाजाचे आदेश देत असताना सतत त्याच त्याच शिक्षकांना आदेश न देता रोटेशन पद्धतीने  शिक्षकांना कामकाजामध्ये सहभागी करून घ्यावे ,जेणेकरून  शिक्षकांना सदर कामकाज करताना तणाव येणार नाही, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारे करण्यात आली आहे. शिक्षक नेते संजय कळमकर ,राज्य उपाध्यक्ष रा या औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सिताराम सावंत, नितीन काकडे, गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, संजय  नळे ,विजय काकडे, सुखदेव मोहिते, सुनील बनोटे, रघुनाथ लबडे, माणिक जगताप ,गजानन जाधव, इमाम भाई सय्यद, सुनिल नरसाळे आदिंनी ही मागणी केली आहे.