Breaking News

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली!

नीट, जेईई परीक्षा वेळेतच : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा समजल्या जाणार्‍या जेईई मेन-2020 आणि नीट-2020 या दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळीच घेतल्या जाव्यात, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर यादरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. तर नीट ही परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. 11 राज्यातील 11 विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा कोरोना महामारीच्या संकट काळात रद्द कराव्यात, अशी सर्वोच्च न्यायालयात याचिकांद्वारे मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावत जेईई आणि नीट परीक्षा ठरल्या वेळापत्रकानुसारच घेण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकाकर्त्यांना खडसावले की, देशातील सर्वच गोष्टींवर बंदी घालायची का? विद्यार्थ्यांचे एक एक बहुमूल्य वर्ष बरबाद करण्याची परवानगी द्यायची का? आपल्याला कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सुरक्षा उपाय योजून पुढे जायला हवे. आता शिक्षणासंबंधी तील सर्वच गोष्टी खुल्या केल्या पाहिजेत. कारण कोरोना महामारी आणखी एक वर्षदेखील राहू शकते. या 11 राज्यातील 11 विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट या परीक्षा घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 जुलैला दिलेली नोटीस रद्द करावी आणि परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती ती मागणी फेटाळण्यात आली आहे. नीट ही परीक्षा ही देशातील वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश देण्यासाठी केंद्र पातळीवर घेतली जाते. तर जेई ई मेन ही परीक्षा विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश देण्यासाठी केंद्रीय पातळीवर घेतली जाते. गुजरातमधील विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षा व्हायला पाहिजेत, अशी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली. परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले. कोरोना महामारीच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे, त्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करू नये अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

-----------------------------------