Breaking News

कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक नागरिकांनी काळजी घ्यावी –आमदार आशुतोष काळे !

कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक नागरिकांनी काळजी घ्यावी –आमदार आशुतोष काळे !
 कोपरगाव प्रतिनिधी  – 
देशात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या व्हायरसने आपला विळखा घट्ट केला असून कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही आठवड्यापासून कोपरगाव तालुक्यात देखील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून हि वाढणारी संख्या चिंताजनक असून यापुढे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
          शासनाकडून जून महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यामुळे सर्व छोटे मोठे व्यावसाय सुरु झाले आहेत. कोपरगाव तालुक्यात जून महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात असतांना मात्र मागील एक महिन्यापासून नियमितपणे कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या काळजी वाढवणारी आहे.कोरोना बाधित रुग्णावर एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये यशस्वी उपचार देखील केले जात आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडत आहे. मागील काही महिन्यांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता या बाधित रुग्णांना आत्मा मलिक वस्तीगृहात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर निश्चितपणे उपचार करण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होणार असला तरी भविष्यात शिर्डी येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येईल.मात्र अशी वेळ येवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेवून कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.