Breaking News

अग्रलेख - अनिलभैय्या अमर रहे!

अग्रलेख - अनिलभैय्या अमर रहे!
Image may contain: 2 people, indoor
         शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड उर्फ भैय्या यांचा अखेर कोरोना रोगाने बळी घेतलाच. गेले पाच महिने सातत्याने कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांसाठी भैय्या धावून जात होते. त्यांना मदत पोहोचविणार्‍या भैय्यांनी वैयक्तिक सुरक्षेकडे तसे दुर्लक्षच केले म्हणायचे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. वयाच्या ७० व्यावर्षी राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला आणि नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे एक पर्व अस्तंगत झाले. कोरोना कालावधीत नगरमधील अनेक गोरगरिबांसाठी अनिलभैय्या हे देवदूत ठरले होते. अनेक कुटुंबांना त्यांनी मदत पोहोचवली. त्यातूनच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते वैद्यकीय उपचाराला चांगला प्रतिसादही देत होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे रामजन्मभूमी मंदीर आंदोलनाची भूमीपूजन व पायाभरणी सोहळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते यशस्वी सांगता होत असताना, या मंदिरासाठी करसेवा दिलेल्या भैय्याने मात्र राममंदिराचा सूर्य उगविण्यापूर्वीच सर्वांचा निरोप घेतला होता. हा ऐतिहासिक सोहळा त्यांना पाहाता आला नाही. नगरमध्ये भैय्या या नावाने ते सर्वपरिचित होते. कधीही मोबाईल करा तो ते उचलणार, आणि केवळ मोबाईलवर तुमचे काम होणार, अशी त्यांची ख्याती होती. म्हणून, त्यांना मोबाईल आमदारही म्हटले जायाचे. भैय्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. ते शिवसैनिक आणि गोरगरीब जनतेचा मोठा आधार होते. त्यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग २५ वर्षे लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या उमेदवारीवर १९९० ते २०१४ अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले. २००९ मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरादेखील होती. नगर जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली गेली.  
          विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. नगर शहरात ज्यांनी गुंडगिरीच्या सहाय्याने राजकारणात पर्दापण केले, त्या गुंडपुंडाचा कर्दनकाळ म्हणून भैय्या ओळखले जायाचे. सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करणे सोपे नव्हते. परंतु, शिवसेनाप्रमुखांचा सैनिक म्हणून ते जिल्ह्यात उभे राहिले व शिवसेनेच्या शाखा खेडोपाडी उभ्या केल्या. नगर शहर तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता. राठोड यांची मोबाईल नेता अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर पाठ नाही, असा माणूस नगर शहरात शोधूनही सापडणार नाही. रात्री-बेरात्री काहीही अडचण असू द्या, नगरकर पहिल्यांदा भैय्यांनाच फोन करायचे. आणि अवध्या काही मिनिटात भैय्याची मदत त्यांना मिळायची. बहुतांशवेळा तर स्वतः भैय्या हजर होऊन त्यांच्या मदतीला धावून जायाचे. तोरण आणि मरणदारी तर भैय्या हमखास दिसून यायचे. त्यांची लोकप्रियता पाहाता, राजकीय धामधुमीत त्यांना अनेकांनी राजकीय ऑफर दिल्यात, पण ते आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान सैनिकच राहिले. मध्यंतरी ते आमदार नव्हते. पण, नगरमध्ये आमदार कोणीही असो. मात्र बुलंद आवाज शिवसेनेचाच म्हणजे अनिलभैय्या राठोड यांचाच राहिला. नगर शहराच्या विकासात भर घालणारी अमृत योजनेंतर्गत विविध विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. तसेच महापालिकेला मिळालेल्या सातशे एकर जमिनीवर डिझनी लँडसारखा मोठा प्रकल्प हाती घेण्याचा त्यांचा इरादा होता. शहरातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरही ते सातत्याने चर्चा करत असे. शहर विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. नुकतेच त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांसाठी नगर शिवसेनेच्यावतीने अकरा लाखांचा धनादेश मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी काहीतरी विकासात्मक कामे करण्यासाठी ही रक्कम सुपूर्द करण्यात आली होती. नगरमधील पाहुणे-रावळेंच्या राजकारणाने त्यांचा राजकीय गेम करण्याचा वारंवार प्रयत्न केला.
            परंतु, लोकांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे ते या राजकारण्यांना पुरून उरले होते. नगर शहराच्या इतिहासात ज्या लोकांनी एकेकाळी बुलेटवर दारू विकली, ज्यांच्या बसस्थानकाच्या बाजूला हॉटेल्स होत्या आणि तेथे मटका-जुगार व इतर अनैतिक धंदे चालायचे, ती माणसे पुढे पुढारी झालेत व राजकारणात येऊन त्यांनी दादागिरीच्या जोरावर नगर शहराचे राजकारण ढवळले. नगरच्या सुसंस्कृत राजकारणाचा बट्ट्याबोळ केला. या गुंड पुढार्‍यांमुळेच जीव मुठीत घेऊन जगणार्‍या नगरकरांना अनिलभैय्यांचाच मोठा आधार होता. नगरचा बिहार होत असताना केवळ भैय्यामुळे या गुंडापुंडाच्या राजकारणाला फिट्ट वेसन होती. परंतु, आता भैय्यांच्या जाण्यामुळे नगरकरांचा मोठा आधार हरपला आहे. अनिलभैय्या यांचे निधन म्हणजे नगरकरांची मोठी हानी असून, या दुर्देवी प्रसंगाने त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसैनिकांवरही मोठेच आभाळ कोसळले आहे. इतकी लोकप्रियता लाभलेला आणि सर्वसामान्यांचे अतोनात प्रेम लाभलेला नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


...