Breaking News

कोपरगावचे कार्यतत्पर आमदार : आशुतोषदादा काळे !

कोपरगावचे कार्यतत्पर आमदार : आशुतोषदादा काळे !
         चारीत्र्य, कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क व दिलेला शब्द पाळणे या गोष्टींबरोबरच अमेरिकेत राहून घेतलेले उच्च  शिक्षण व हाती घेतलेलं काम तडीस लावण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाच्या अजोड कार्यपद्धतीमुळे यशस्वी राजकारणी म्हणून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाहिले जाते. सहकारी साखर कारखानदारी पुढे अनेक संकट असतांना कर्मवीर शंकरराव काळे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना तोटामुक्त करून दाखवत सहकारी साखर कारखानदारीपुढे आदर्श ठेवला आहे. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे शिवधनुष्य खांद्यावर घेत विकास कामांची एकेक वीट रचत असून सत्ता असतांना विकासप्रक्रिया कशी चालवायची असते याचा वस्तुपाठ आशुतोष दादांनी घालून दिला आहे.
           २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारून सुज्ञ मतदारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावच्या विकासाला चालना देण्यासाठी आशुतोषदादांना विधानसभेत पाठविले.निवडणुकीत ८२२ मतांनी मिळालेला विजय हा जरी विरोधकांना निसटता पराभव वाटत असला तरी हा पराभव निसटता मुळीच नाही कारण २०१४ च्या निवडणुकीत आशुतोषदादांना २९,०९४ म्हणजेच जवळपास ३० हजार मतांनी पराजित व्हावे लागले होते. त्यामुळे आशुतोषदादांनी मिळविलेला विजय हा २९,०९४ अधिक ८२२ असा २९,९१६ मतांनी मिळालेला विजय आहे. विरोधकांना २९,०९४ मध्ये वाढ का करता आली नाही? ही वाढ का झाली नाही? याची माहिती मात्र मतदारच देवू शकतात.
        माणसाने  कुणाच्या पोटी जन्माला यावं, हे आपल्या हातात नसलं, तरी ज्या कुटुंबात आपण जन्माला आलो, त्या परिवाराच्या  सदगुणांचे वारसदार होणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असत. शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भगीरथ शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा आशीर्वाद व कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे परिवाराचा आदर्श समाजकारणाचा वारसा आशुतोष दादा पुढे चालवीत आहे.नेतृत्व कशाला म्हणायचे व नि:स्वार्थी, प्रामाणिक आणि आदर्शवत नेतृत्व कसं असावं याचा परिपाठ आशुतोषदादांनी तरुणाईपुढे ठेवला आहे.
          २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत मागील पाच वर्षात सातत्याने जनतेसोबत राहून, जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून व वेळप्रसंगी दोन दिवस आमरण उपोषण करून आशुतोषदादांनी जनतेच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काही महिन्यांनी पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ईतिहास घडवत कोपरगाव तालुक्यात एकहाती सत्ता मिळवून ग्रामीण भागात सुरु केलेला विकासाचा झंझावात विधानसभा निवडणुकीत मैलाचा दगड ठरला व आमदार आशुतोषदादांची आपण केलेली निवड किती योग्य होती याची प्रचीती जनतेला निवडणुकी नंतर अगदी काही दिवसातच आली.
           पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या कोपरगाव शहराच्या नागरिकांना उन्हाळ्यात कधी १६ दिवसांनी ते कधी २३ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता याचा प्रामुख्याने महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.हा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी आशुतोष दादांनी अनेक आंदोलने केली. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने पाच नंबर साठवण तलाव खोदून देवून त्यातील दगड, मुरूम, माती  समृद्धी महामार्गासाठी घेवून जावा यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून साठवण तलावाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहरवासियांना पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे वचन दिले होते. हि वचनपूर्ती करण्यासाठी निवडून येताच आशुतोषदादांनी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्या मदतीने पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम सुरु करून आपल्या कामाची चुणूक दाखविली. लोकप्रियता टाळत निवडून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच जनतेचे विकासकामांचे प्रश्न थेट विधानसभेत मांडून जनतेच्या विश्वासाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे आशुतोषदादाचं व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा नक्कीच आगळ -वेगळ आहे.
      आशुतोष दादांचे उत्तम नियोजन व प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जावून त्या प्रश्नाची तड लावण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मागील हंगामात गोदावरी कालव्याच्या सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ मिळाला आहे. यापूर्वी जाहीर झालेलं आवर्तन कधीच दिली गेली नाही. जे आवर्तन सोडली जायची ती सुद्धा अडीच किलोमीटरच्या आतच दिली जात होती. त्या बाबतीत दादांनी जातीने लक्ष घालून लाभधारक एकही शेतकरी आवर्तनापासून वंचित राहणार याची खबरदारी  घेण्याच्या  सक्त सूचना पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे सर्व लाभधारक  शेतकऱ्यांना  सर्व आवर्तन पूर्ण क्षमतेने व आवर्तनाचा लाभ आवर्तनाचा तोही शेवटच्या लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. २०१९ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मदत मिळावी यासाठी आशुतोषदादांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तीनच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २७ कोटीची नुकसान भरपाईची मदत जमा झाली. एवढ्या लवकर व एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची हि पहिलीच वेळ आहे. मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे रखडलेले ठिबक सिंचनचे अनुदान १ कोटी २४ लाखाचे अनुदान आशुतोषदादांनी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे. चालू हंगामात सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची दखल घेत बियाणे उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांना दुसरे बियाणे देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचे बियाणे मारून शेतकऱ्यांच्या घामाची चेष्टा करणाऱ्या या बियाणे उत्पादक कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस अहमदनगर जिल्ह्यात फक्त आशुतोषदादांनी उचलले त्यामुळे मतदार संघातील बळीराजा सुखावला आहे.
         संपूर्ण विश्वावर सध्या कोरोना विषाणूचे संकट आलेले आहे. आपल्या देशातही कोरोनाने मोठे थैमान घातले आहे. राज्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. कोरोना संसर्गाची भीती न बाळगता योग्य ती  काळजी घेवून आशुतोषदादा सातत्याने जनतेसोबत आहे. प्रशासनाला आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देत मदतीला स्वतःची यंत्रणा उभी केली. मतदार संघातील प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध उपलब्ध करून देत औषध फवारणी करून घेतली. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, खाजगी डॉक्टर्स तसेच कोरोनाच्या लढ्यात जे कोरोना योद्धे लढत आहे त्यांना पीपीई कीट, फेस शिल्डमास्क, रुग्ण तपासणी साठी अद्यावत साहित्य वेळेत उपलब्ध करून दिले. कोरोनाच्या भीतीपोटी किरकोळ व्याधींनी त्रस्त रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊ लागले व त्याचवेळी कोरोणाच्या प्राथमिक तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांची गर्दी मोठी होती. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका ओळखून आशुतोष दादांनी गरजू रुग्णांसाठी फोनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर रुग्णालयात गेल्याशिवाय गत्यंतरच नाही अशा रुग्णांना तातडीची सेवा मिळावी यासाठी कम्युनिटी क्लिनिक सुरु केले. कोरोनाच्या संकटात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अंत्योदय कुटुंबाना रेशनवर मोफत धान्य दिले. श्री. साईबाबा तपोभूमी येथे नियमित ५०० नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून दिले.ज्यावेळी बाहेरच्या राज्यातील नागरिकांना आपल्या गावी परत जाण्यासाठी लॉकडाऊनमुळे वाहन उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे हे परराज्यातील नागरिक आपल्या चिल्यापिल्यांना घेवून पायीच आपल्या गावी निघाले होते. हे नागरिक कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर आशुतोषदादांच्या नजरेस पडले त्यावेळी या पायी चालणाऱ्या कुटुंबाची आपुलकीने चौकशी करून या नागरिकांना नाश्ता, पाणी व मास्क दिले व एवढ्यावरच न थांबता या नागरिकांना कोपरगाव तालुक्याच्या सिमेपासून शेजारच्या तालुक्याच्या सीमेपर्यंत वाहन उपलब्ध करून देवून त्यांचा प्रवास सुखकर करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. शेजारील तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असतांना आशुतोष दादांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात परिस्थिती नियंत्रणात आहे. लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरु होवून शिथिल झालेल्या अटी व नागरिकांना सहजपणे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात येणे-जाणे वाढल्यामुळे काही प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या जरी वाढली असली तरी भविष्यातील धोका ओळखून आशुतोषदादांनी कोपरगाव येथे सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात असून अनेक रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे देखील झाले आहेत.
        २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी आशुतोषदादांच्या प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या भविष्यातील मोजक्याच राजकारण्यांमध्ये आशुतोष असेल असे अतिशय सूचक वक्तव्य करून भविष्यात आशुतोषच्या खांद्यावर राज्याची मोठी जबाबदारी असेल असे सुतोवाच केले होते. आशुतोषदादांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी करता येवू शकतो या दूरदृष्टीतून रत्नपारखी पवार साहेबांनी आपले शब्द सत्यात उतरवून आशुतोषदादांच्या खांद्यावर अत्यंत कमी वयात रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदरी सोपविली आहे.
         राजकारणाच्या रणांगणात प्रत्येक राजकीय नेते निवडणुकीपूर्वी विकास करण्याचे वचन देत असतात. निवडून आल्यानंतर या नेत्यांना या वचनाचा विसर देखील पडतो व पुढील निवडणूक आली की जागे होणारे राजकीय व्यक्ती आपण सर्वांनी पाहिल्या आहे अनुभवल्या आहे. मात्र याला आशुतोषदादा अपवाद ठरले आहेत. विकासाचा यज्ञ प्रज्वलित ठेवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्नांची आहुती टाकणे गरजेचे असल्याची जाणीव असणाऱ्या आशुतोषदादांनी पहिल्याच अधिवेशनात पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे ६० टीएमसी पाणी पूर्वेकडील अतितुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवावे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. आशुतोष काळे यांनी पहिल्याच अधिवेशनात शेती सिंचनाच्या महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधून घेत निधीची मागणी करून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी २०१८/१९ चे दुष्काळी अनुदान व पाच नंबर साठवण तलावासाठी निधी मिळावा. कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या, बाजारपेठेचा प्रश्न व विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न व्यापारी संकुल उभारल्यानंतर सुटणार आहे. या प्रश्नाला अधिवेशनात उपस्थित करून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावसह राज्यातील विविध बसस्थानक परिसराचा व्यापारी संकुलाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले असता परिवहन मंत्र्यांनी तात्काळ सहमती दर्शविली आहे. मतदार संघात रानडुक्कर, काळवीट आदि जंगली श्वापदांचा वावर मतदार संघातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वापदांकडून रात्रीच्या वेळी शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील हानी होत आहे. याची दखल घेवून हा देखील प्रश्न मागील अधिवेशनात आशुतोषदादांनी मांडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विविध खात्याच्या मंत्रीमहोदयांना भेटून गोदावरी कालवे, उजनी उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी, विजेचे प्रश्न, रस्ते, पाणी पुरवठा योजना, उपजिल्हा रुग्णालय, डायलिसीस सेंटर आदी पायाभूत व मुलभूत सुविधा मतदार संघातील नागरिकांसाठी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करीत आहेत.
            महाराष्ट्राच्या राजकारणात एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आशुतोषदादा काळे यांनी अल्पावधीतच आपलं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत काळे परिवाराचा चालत आलेला कृषी, सहकार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्याचा वारसा ते समर्थपणे चालवीत आहेत. मागील पाच वर्षात रखडलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठका घेवून या प्रश्नांना त्यांनी चालना दिली आहे. मतदार संघातील जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद त्यांना परमेश्वराने  द्यावी यासाठी त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो व भविष्यात त्यांच्या रूपाने कोपरगावकरांना व महाराष्ट्राला एक मंत्री म्हणून लाभोत हीच सदिच्छा!
संकलन – श्री. अरुण जोशी (स्वीय सहाय्यक)
शब्दांकन - श्री. राजेंद्र जाधव