Breaking News

चीनने लष्करी प्रयोगशाळेत बनवला कोरोना विषाणू !


चीनने लष्करी प्रयोगशाळेत बनवला कोरोना विषाणू
- धक्कादायक !
- पलायन केलेल्या महिला वैज्ञानिकाचा दावा
- मांसाच्या बाजारातून विषाणू पसरल्याची माहिती खोटी
वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या मुद्यावर चीनने जगभराचा रोष ओढवून घेतला असताना, चीनने हा विषाणू लष्करी प्रयोगशाळेत तयार केला, असा दावा चीनमधून अमेरिकेत पलायन केलेल्या एका महिला वैज्ञानिकाने केला आहे. हा विषाणू विक्राळ रूप धारण करीत असल्याची जाणीव चीनला मागील वर्षी डिसेंबरमध्येच झाली होती, पण त्यांनी ही बाब उघड होऊ दिली नाही, असा दावादेखील या वैज्ञानिकाने केला.
हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत धक्कादायक खुलासा केला. चीनच्या लष्करी प्रयोगशाळेत हा घातक विषाणू तयार करण्यात आला होता. चीनमधील एका बाजारातून हा विषाणू पसरल्याचा चीनकडून केला जाणारा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. ही महामारी सुरू झाली तेव्हाच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या लष्करी प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरल्याचे विश्लेषण मी केले होते. ही बाब लपवण्यासाठी वुहानमधील कुत्र्यांच्या मांसाची विक्री करणार्‍या बाजारातून हा विषाणू पसरल्याची कहाणी रचण्यात आली होती. चीनचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा आरोपदेखील त्यांनी केला.
--
जिवाला धोका असल्याने वैज्ञानिकेचे पलायन
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरोधात वक्तव्य केल्यामुळे जिवाला धोका निर्माण झाल्यामुळे मला पलायन करावे लागले, असे त्यांनी सांगितले. मी कार्यरत असलेली हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेसोबत संलग्न आहे. कोरोना विषाणूच्या मुद्यावर काही बोलायचे नाही, अशी धमकी या संस्थेने दिल्याचा आरोप त्यांनी केला. या विषाणूबाबत चीनने जगासोबत लपवालपवी केली. आंतरराष्ट्रीय समुदायाला या विषाणूबाबत फारशी माहिती दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.
------------------