Breaking News

रस्ता कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेवासा काँग्रेसचे धरणे व आमरण उपोषण आंदोलन !

रस्ता कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेवासा काँग्रेसचे धरणे व आमरण उपोषण आंदोलन !


नेवासा तालुका प्रतिनिधी - 
शनिशिंगणापूर-नेवासा व वडाळा-कौठा रस्ताकामांत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असून त्यांच्या सखोल चौकशीच्या आग्रही मागणीसाठी येत्या दि.31 ऑगस्ट पासून अहमदनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे व आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून नेवासा (संत ज्ञानेश्वर मंदिर) ते शनिशिंगणापूर या दोन महत्त्वाच्या देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्यासह वडाळा बहिरोबा ते म्हाळसपिंपळगाव-कौठा दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्यावर्षी घाईघाईने उरकण्यात आले. या दोन्ही रस्त्यांच्या ठेकेदारांनी मंजूर अंदाजपत्रक, प्लॅन-इस्टिमेट प्रमाणे या रस्त्यांचे काम न करता मनमानीपणाने उरकल्याने अत्यन्त सुमार दर्जाचे झाल्याकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यांचा निर्धारित देखभाल-दुरुस्ती कालावधी मुदतीतच या रस्त्यांची 'वाट' लागून दळणवळणाच्या दृष्टिकोनातून ते अत्यल्पावधीतच ते कुचकामी ठरू लागल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचा भरभक्कम निधी शासनाने उपलब्ध करून देऊनही संबंधितांनी अवघ्या काही लाखांतच हे काम उरकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण असतानाही या रस्ता कामांत प्रचंड प्रमाणावर अनियमितता झालेली असल्याने संबंधित विभागाचे शासकीय अधिकारीही या भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

यापार्श्वभूमीवर नेवासा ते शनिशिंगणापूर तसेच वडाळा बहिरोबा ते कौठा या रस्ता कामांची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी संबंधितांकडून चालढकल केली जात असल्याने येत्या सोमवार दि.31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अहमदनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे व आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 ठेकेदार-अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - माळवदे
     गेल्या काही वर्षांत नेवासा तालुक्यात रस्ता कामातील बदमाश ठेकेदारांची साखळी तयार झाली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून या लोकांनी शासकीय निधीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. आतापर्यंत शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही नेवासा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह राहणार आहे. - संभाजी माळवदे, अध्यक्ष-नेवासा तालुका काँग्रेस