Breaking News

अहमदनगर महापालिकेत नागरिकांना प्रवेश बंदी !

 अहमदनगर महापालिकेतील शहर ...

अहमदनगर  : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि महापालिका कर्मचारी युनियनचा आग्रह यामुळे दोन आठवडे बंद असलेले महापालिकेचे कामकाज सोमवारपासून काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता आहे. पन्नास टक्के कर्मचारी कामावर येणार असले, तरी नागरिक, ठेकेदारांना महापालिका कार्यालयात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील दोन आठवड्यांपासून महापालिकेची कार्यालये बंद होती. कोरोना बाधितांमध्ये महापालिका कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याने त्यात काहींना जीव गमवावा लागल्याने महापालिका कामगार युनियन आक्रमक झाली होती. चौदा दिवसांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ला परवानगी देण्याची मागणी युनियनने केली होती. पहिल्या टप्प्यात सात आणि दुसर्‍या टप्प्यात सात असे चौदा दिवस महापालिका प्रशासनाने यास मान्यता दिली. मात्र यामुळे महापालिकेचे दैनंदीनसह कोरोना उपाययोजनाच्या कामावरही परिणाम झाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये बंद होती.

युनियनसोबत झालेल्या चर्चेनुसार चौदा दिवसांचा कालावधी संपल्याने आता सोमवारपासून पन्नास टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. मात्र हे करत असताना नागरिक आणि ठेकेदार यांना महापालिका कार्यालयात प्रवेश बंदी ठेवली आहे. महापालिकेचे दैनंदीन कामकाज काही प्रमाणात सुरू होणार असले तरी नागरिकांची कामे मार्गी लागण्याची शक्यता यामुळे धुसर झाली आहे. या संदर्भात झालेल्या चर्चेत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर यांनी सहभाग घेतला. चर्चेनंतर या बाबींनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलावर यांनी मान्यता दिली.