Breaking News

सहकारी बँका वाचवा!

- शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या सहकारी बँकांबाबत पवारांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण करताना इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला, असे पवार पत्राच्या सुरुवातीला म्हणतात. केंद्र सरकारने मध्यमवर्गीयाचे हित जपण्यासाठी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्ही म्हणालात. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो, असे पवारांनी लिहिले. सहकारी बँकाना 100 वर्षाची परंपरा लाभली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र प्रथमदर्शनी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँक क्षेत्राबाबतचे धोरण ‘अस्पृश्य’तेचे राहिले आहे, असा खेद पवारांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने रिझर्व्ह बँकेला प्रत्येक वर्षी इन्स्पेक्शन करणे कठीण जात आहे, त्यामुळे सहकारी बँकांना खासगी बँकेत परिवर्तीत करण्यास जोर धरला जात आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधले. सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटले जाते, मात्र सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. घोटाळे, रक्कम आणि टक्केवारी मांडत पवारांनी सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत करणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणीही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.